(सिंधुदुर्ग / प्रतिनिधी)
धबधबा म्हटलं की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे आंबोली. दक्षिण महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांच्या पश्चिम घाटात वसलेलं हे ठिकाण निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. आंबोली समुद्रसपाटीपासून सुमारे ६९० मीटर उंचीवर वसलेलं असून, दाट जंगलं, धुक्याची चादर आणि वर्षभर प्रवाहित होणारे धबधबे यामुळे हे एक अत्यंत रमणीय पर्यटनस्थळ मानलं जातं. येथील जैवविविधता विशेष उल्लेखनीय आहे, कारण अनेक दुर्मीळ वनस्पती आणि प्राणी प्रजाती इथे आढळतात. आंबोली धबधबा हा पावसात कोकणातील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे.
दक्षिण कोकणातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या या आंबोली घाटात यंदा पावसाळी पर्यटनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाट परिसरातील निसर्गसौंदर्य अधिक खुलून दिसत असून, रविवारी पर्यटकांचा अक्षरशः महापूर पाहायला मिळाला.
पावसाळी हंगामाच्या पहिल्याच मोठ्या सुट्टीच्या दिवशी सिंधुदुर्गसह गोवा आणि कर्नाटकातून हजारो पर्यटक आंबोली घाटात दाखल झाले. महिनाभर उशिराने धबधबे प्रवाहित झाले असले तरी, त्यानंतर तयार झालेल्या जलप्रपातांचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.
मुख्य धबधब्याखाली स्नान करण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये कुटुंबांसह महिला, लहान मुले आणि तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला. धबधब्याचा आनंद घेताना अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्यात निसर्गाचे दृश्य टिपत सोशल मीडियासाठी फोटो आणि व्हिडिओ बनवले.
गर्दी टाळण्यासाठी काही पर्यटकांनी कावळे साद पॉईंट, चौकुळ आणि महादेवगड परिसरातील तुलनेने शांत भागांचा पर्याय निवडला. गारठवणाऱ्या वातावरणात पावसात भिजत पर्यटकांनी गरमागरम चहा, कांदा भजी, वडापाव आणि मक्याच्या कणसांचा आस्वाद घेतला. स्थानिक हॉटेल्समध्ये कोकणी खाद्यपदार्थांना मोठी मागणी दिसून आली.
संपूर्ण घाट परिसर दाट धुक्याने वेढला गेला होता. काही अंतरावरचे दृश्यही स्पष्ट दिसत नव्हते, इतक्या दाट धुक्यात कोसळणारे धबधबे आणि पावसाच्या सरी यामुळे आंबोलीचे वातावरण अत्यंत रमणीय आणि आल्हाददायक बनले होते. या निसर्गसौंदर्याने पर्यटकांना अक्षरशः भुरळ घातली.
मात्र पर्यटकांच्या प्रचंड गर्दीचा परिणाम वाहतुकीवरही झाला. घाट परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. प्रशासनाने पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था केली असली तरी काही पर्यटकांनी रस्त्याच्या कडेला वाहने उभी केल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली. सावंतवाडी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
एकूणच, धुके, पावसाच्या सरी आणि ओसंडून वाहणारे धबधबे यामुळे आंबोली घाट पुन्हा एकदा पावसाळी पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरला आहे.

