(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
भारतीय लष्कराने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गणवेशाबाबत २०२३ मध्ये लागू केलेले एकसमान पोशाखाचे धोरण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ डिसेंबरपासून ब्रिगेडियर आणि त्यावरील अधिकाऱ्यांना आपल्या मूळ रेजिमेंट किंवा कोरची पारंपरिक ओळख दर्शवणारी चिन्हे आणि विशिष्ट पोशाख पुन्हा वापरता येणार आहेत. १३ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या पत्राच्या आधारे हा अंतर्गत आदेश देण्यात आला आहे.
नव्या निर्णयामुळे गोरखा रायफल्सचे जनरल पुन्हा त्यांच्या रेजिमेंटची ओळख असलेली टोपी परिधान करू शकतील. स्पेशल फोर्सेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मरून बेरेट, तर बख्तरबंद रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांना काळी बेरेट घालण्याची मुभा मिळणार आहे. याशिवाय अधिकृत गणवेशावर संबंधित रेजिमेंट किंवा कोरशी निगडित पारंपरिक चिन्हे लावण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.
२०२३ मध्ये लष्कराने वरिष्ठ नेतृत्वामध्ये एकसमान ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने गणवेशातील अनेक बाबी समान केल्या होत्या. या धोरणानुसार अधिकाऱ्यांच्या मूळ रेजिमेंट आणि सेवेची ओळख दर्शवणारी स्वतंत्र चिन्हे काढून टाकण्यात आली होती. आता हा निर्णय बदलल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुन्हा आपल्या रेजिमेंटशी संबंधित पारंपरिक पोशाख आणि चिन्हे वापरता येणार आहेत.
दरम्यान, नॅशनल सिक्युरिटी गार्डने (NSG) आपल्या ब्लॅक कॅट कमांडोंच्या गणवेशातही बदल करण्याची तयारी केली आहे. व्हीआयपी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कमांडोंना प्रचंड उष्णतेचा त्रास होऊ नये, यासाठी अधिक हवेशीर आणि शरीरातील ओलावा बाहेर सोडणारा गणवेश तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. हा नवीन पोशाख नायको कापडापासून बनवण्यात येणार असून, त्यामध्ये नायलॉन आणि कॉटनचा समावेश असेल. या कापडामुळे हवा खेळती राहण्यास आणि ओलावा सहज बाहेर जाण्यास मदत होणार आहे.
एप्रिल महिन्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सुरक्षेसाठी विजयवाडा येथे तैनात असलेला एक कमांडो ४४ अंश तापमानात बेशुद्ध पडला होता. या घटनेनंतर कमांडोंसाठी हवेशीर गणवेश उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा होईपर्यंत एनएसजीचे कमांडो नवीन गणवेश वापरू लागतील, अशी अपेक्षा संस्थेकडून व्यक्त करण्यात आली आहे.


