(लांजा / वार्ताहर)
मुंबई-गोवा महामार्गावर धनावडे शेती फार्म येथे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात देवधे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आणि रिक्षाचालक संजय नारायण मणचेकर (वय ४२) यांचा मृत्यू झाला. रस्त्यावर आडव्या आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी झाल्याने ते गंभीर जखमी झाले होते. लांजा येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
देवधे येथील रहिवासी असलेले संजय मणचेकर रिक्षा व्यवसाय करत होते. रिक्षा संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणूनही ते परिचित होते. याशिवाय देवधे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची जबाबदारी ते सांभाळत होते. बुधवारी दुपारी ते लांजा येथून आपल्या देवधे येथील घरी जेवणासाठी रिक्षाने जात होते. धनावडे शेती फार्म परिसरात त्यांची रिक्षा आली असता समोर अचानक कुत्रा आडवा आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी झाली.
याचवेळी पाठीमागून रिक्षाने त्यांचे चुलत भाऊ प्रकाश जानू मणचेकर येत होते, त्यांनी हा अपघात पाहिला असता त्यांनी तातडीने आपल्या रिक्षातून संजय मणचेकर यांना लांजा येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
संजय मणचेकर यांच्या निधनाने देवधे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे. या अपघाताचा अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.


