(खेड / वार्ताहर)
नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा निकालात जिल्हा परिषद भरणे नं. १ शाळेने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. शाळेचे तब्बल आठ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले असून, संपूर्ण जिल्ह्यात शाळेने दैदिप्यमान यश मिळवले आहे.
या परीक्षेत शाळेचा विद्यार्थी वेदांत धनंजय नायकल याने 84.66 टक्के गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच गौरव ज्ञानेश्वर भांबड (81.33%), निधी गणपत मुठे (78%), संचिता सुनील पांगुळ (70.66%), वेदांत चंद्रकांत खळे (70.66%), हित संतोष कदम (70%), रुची रुपेश मर्चंडे (70%) आणि वैष्णवी संदीप चव्हाण (67.33%) यांनीही गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या यशात मोलाची भर घातली.
या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षिका शशिकला नामदेव हेळगावकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रम, नियोजनबद्ध अध्यापन आणि विद्यार्थ्यांकडून करून घेतलेल्या मेहनतीमुळे हे उल्लेखनीय यश शक्य झाले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका लीना हरमळकर (पेंडखळकर) यांनी विद्यार्थ्यांना आणि मार्गदर्शक शिक्षिकांना वेळोवेळी प्रोत्साहन देत यशामागे महत्त्वाची भूमिका बजावली.
शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ तसेच खेड तालुक्यातील विविध स्तरांतून विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि शाळेचे अभिनंदन होत आहे.

