( रत्नागिरी / वार्ताहर )
टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित निवड प्रक्रियेत दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे येथील १७ वर्षांखालील मुलांच्या गटातील विद्यार्थी कु. आर्यन सुदेश पवार याने राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळवले आहे. त्याच्या या निवडीमुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा १८ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तालुका क्रीडा संकुल, कळंब, धाराशिव (उस्मानाबाद) येथे सुरु आहे. या स्पर्धेत आर्यन रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
आर्यनला शाळेच्या क्रीडा शिक्षिका ऋतुजा जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा आणि संस्थेच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सुर्वणा देशमुख आणि अध्यक्ष रहीम माद्रे यांनीही त्याचे विशेष कौतुक केले.
आगामी राज्यस्तरीय स्पर्धेत आर्यनने उत्तम खेळाचे प्रदर्शन करून शाळा, संस्था आणि रत्नागिरी जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा त्याला देण्यात आल्या आहेत.


