(लांजा / वार्ताहर)
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू कंटेनरचे अंजणारी घाटातील तीव्र उतारावर अचानक ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला. चालकाने महामार्गावरील मोठा अपघात टाळण्याचा प्रयत्न करत कंटेनर डोंगराच्या दरडीवर आदळवला; मात्र धडकेनंतर कंटेनर महामार्गाच्या मधोमध पलटी झाला. या अपघातात चालक सलीम मेवती गंभीर जखमी झाला असून महामार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे त्याला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
हा अपघात आज दुपारी सुमारे ३.१० वाजण्याच्या सुमारास अंजणारी घाटातील अंजनारी पुलाजवळ घडला. घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सलीम मेवती हे मालाने भरलेला कंटेनर घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होते. अंजणारी पुलाजवळ पोहोचताच कंटेनरचे अचानक ब्रेक फेल झाले.
ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच महामार्गावरील मोठा अपघात टाळण्यासाठी चालकाने कंटेनर नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्यात कंटेनर थेट महामार्गालगतच्या डोंगराला जाऊन धडकला. या धडकेनंतर कंटेनर महामार्गाच्या मधोमध पलटी झाल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या चालकाला रुग्णवाहिकेच्या मदतीने तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे त्याला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले.
दरम्यान, महामार्गाच्या मधोमध पलटी झालेला कंटेनर वाहतुकीसाठी अडथळा ठरत होता. पोलिसांच्या पथकाने क्रेनच्या साहाय्याने कंटेनर सुरक्षितपणे बाजूला हटवला आणि काही काळ विस्कळीत झालेली महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत केली.

