लोणार सरोवराचे वैशिष्ट्य म्हणजे उल्कापातामुळे निर्माण झालेले त्याचे विवर आजही अत्यंत चांगल्या स्थितीत जतन झाले आहे. अंदाजे १२ हजार वर्षांपूर्वी तयार झालेल्या या विवराचा व्यास सुमारे १.८८ किलोमीटर आहे. पृथ्वीवरील अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या अतिवेगवान उल्कापातजन्य विवरांमध्ये त्याची गणना होते. सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या आणि विस्तीर्ण प्रदेशात पसरलेल्या दख्खन ट्रॅप्सच्या बेसॉल्ट खडकांच्या थरांमध्ये हे विवर तयार झाले आहे.
बेसॉल्ट खडकांच्या पृष्ठभागावर उल्कापातामुळे निर्माण झालेली पृथ्वीवरील केवळ पाच ज्ञात विवरे आहेत. त्यापैकी लोणार सरोवराचा समावेश असल्याने या स्थळाला विशेष भूवैज्ञानिक महत्त्व प्राप्त झाले आहे. विवराच्या मध्यभागी खारट आणि अल्कधर्मी पाण्याचे सरोवर असून, त्यामुळे येथे वेगळे भूवैज्ञानिक आणि पर्यावरणीय वैशिष्ट्य निर्माण झाले आहे.
विवराचा गोलाकार आकार, खोली आणि व्यास यांचे प्रमाण, आतील उतारांवर उघडे पडलेले बेसॉल्ट लाव्हाचे थर, जमिनीखालील खडकांचे तुकडे झालेले थर आणि बाहेरच्या दिशेने झुकलेले मूळ खडकांचे थर हे त्याच्या निर्मितीचे महत्त्वाचे पुरावे आहेत. याशिवाय खडकांचे ढिगारे, तुटलेले खडकांचे तुकडे आणि स्यूव्हाइटचा समावेश असलेले मोठ्या प्रमाणावरील बाहेर फेकलेल्या खडकांचे साठेही येथे आढळतात. हे सर्व भूवैज्ञानिक पुरावे लोणार विवराची निर्मिती उल्कापातामुळे झाल्याचे स्पष्ट करतात, असे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
इंटरनॅशनल युनियन ऑफ जिऑलॉजिकल सायन्सेस ही संस्था भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये, प्रक्रिया आणि शोध यांची उत्कृष्ट उदाहरणे असलेल्या तसेच विशेष वैज्ञानिक महत्त्व जपणाऱ्या ठिकाणांना भूवैज्ञानिक वारसास्थळ म्हणून मान्यता देते. पृथ्वी आणि तिचा इतिहास समजून घेण्यासाठी ही स्थळे जगातील महत्त्वपूर्ण वैज्ञानिक ठेवा मानली जातात. जगाच्या विविध भागांत पसरलेल्या या स्थळांमुळे पृथ्वीवरील महत्त्वाच्या भूवैज्ञानिक घटनांचा आणि प्रक्रियांचा अभ्यास करण्याची संधी मिळते.
या उपक्रमांतर्गत २०२२ मध्ये स्पेनमधील झुमाया येथे पहिल्या १०० भूवैज्ञानिक वारसास्थळांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्याला मिळालेला जागतिक प्रतिसाद आणि प्रभाव लक्षात घेऊन पुढील निवड प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर २०२४ मध्ये दक्षिण कोरियातील बुसान येथे झालेल्या ३७ व्या आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक परिषदेदरम्यान दुसऱ्या १०० स्थळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. आता तिसऱ्या १०० स्थळांच्या यादीत लोणार सरोवराला स्थान मिळाले आहे.
२०२२ पासून या उपक्रमात ९० देशांतील एक हजाराहून अधिक तज्ज्ञ आणि २० आंतरराष्ट्रीय संस्थांनी सहभाग घेतला आहे. विविध भूवैज्ञानिक स्थळांची शिफारस करणे, त्यांच्या निवड प्रक्रियेत सहभागी होणे आणि वैज्ञानिक गुणवत्तेचे मूल्यमापन करणे, अशी जबाबदारी या तज्ज्ञांनी पार पाडली आहे. आययूजीएस संस्थेचे ७४ सक्रिय राष्ट्रीय सदस्य असून, जगातील सर्वात मोठ्या वैज्ञानिक संस्थांमध्ये तिचा समावेश होतो. पृथ्वीविज्ञानाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे आणि मानवी कल्याणासाठी या विषयातील सहभागाला प्रोत्साहन देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. लोणार सरोवराचा या जागतिक यादीत समावेश झाल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील या अद्वितीय भूवैज्ञानिक स्थळाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.


