(खेड)
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळे जांभुळवाडी हिने शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत ‘मंथन सामान्य ज्ञान परीक्षा २०२६’ मध्ये १०० टक्के निकाल प्राप्त केला आहे. या उल्लेखनीय यशामुळे शाळेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या परीक्षेत शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवत उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्यामध्ये कु. पुष्कर अंकुश निकम आणि कु. सिद्धी संतोष जोशी (इयत्ता चौथी) यांनी प्रत्येकी २४४/३०० गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच कु. धनश्री विकेश महादे (२४०/३००), कु. निशा अंकुश निकम (१६०/३००) आणि कु. मिहीर मिलिंद लव्हाळे (१०६/१५०) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.
शैक्षणिक यशाबरोबरच भौतिक सुविधांच्या बाबतीतही ही शाळा जिल्ह्यात अग्रेसर ठरत आहे. शाळेत डिजिटल क्लासरूम, ई-लर्निंग सुविधा आणि एआय (AI) आधारित संगणक प्रयोगशाळा उपलब्ध असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कृतीआधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब केला जात आहे.
या यशाबद्दल केंद्रप्रमुख श्री. सु. रा. पवार, मुख्याध्यापक श्री. रवींद्र हरिश्चंद्र इटकर, मार्गदर्शक शिक्षक श्री. निलेश सखाराम कांदेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. सायली संतोष जोशी व अध्यक्ष श्री. विकेश राजाराम महादे यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले आहे. शाळेच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ग्रामस्थांमध्येही समाधानाचे वातावरण असून, सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

