(खेड)
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याने पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे. खेड तालुक्यातील तस्नीम बुरोंडकर आणि समरीन बुरोंडकर या होतकरू खेळाडूंची महाराष्ट्र महिला कबड्डी संघात निवड झाली आहे. मध्यप्रदेश येथे १९ ते २२ मार्च २०२६ दरम्यान होणाऱ्या ५ व्या सीनियर फेडरेशन कप महिला कबड्डी स्पर्धेसाठी त्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
भरणे येथील अनिकेत स्पोर्ट्स क्लबच्या या दोन्ही खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राज्य निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. राज्यभरातून झालेल्या कठोर निवड प्रक्रियेतून मार्ग काढत त्यांनी महाराष्ट्र संघात आपले स्थान मिळवले.
तस्नीम आणि समरीन यांनी यापूर्वी जिल्हा तसेच विभागीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यांच्या यशामागे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंबीयांचे पाठबळ आणि अनिकेत स्पोर्ट्स क्लबचे सातत्यपूर्ण योगदान महत्त्वाचे ठरले आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही मोठी गौरवास्पद बाब मानली जात आहे. त्यांच्या कामगिरीकडे आता संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या निवडीबद्दल क्रीडाप्रेमी, स्थानिक नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून बुरोंडकर भगिनींवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून राज्याचे नाव उंचवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

