(खेड)
जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या पुरस्कृत प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धा आज शुक्रवार, दिनांक १९ डिसेंबर रोजी आदर्श शाळा, मांडवे नं. १ येथे उत्साहात व यशस्वीपणे पार पडल्या. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांना परिसरातील शाळा, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन श्री सचिन धाडवे, सौ. सुप्रिया पवार मॅडम तसेच मांडवे गावच्या सरपंच सौ. सुनीता कासार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री श्रीकांत शिर्के, श्री राजेंद्र शेलार, श्री सुरेश मोरे, विस्तार अधिकारी श्री वरेकर, केंद्रीय प्रमुख उंडे, श्री सु. रा. पवार यांच्यासह तळे, दहिवली आणि कळबणी केंद्रातील शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत तळे–जांभुळवाडी शाळेतील पुष्कर अंकुश निकम याने लहान गटात उत्कृष्ट कामगिरी करत
थाळी फेक प्रकारात प्रथम क्रमांक, तर गोळा फेक प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून शाळेचे, गावाचे व केंद्राचे नाव उज्ज्वल केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल मांडवे प्रभागाचे विस्तार अधिकारी श्री वरेकर, केंद्र प्रमुख पवार आणि उंडे यांच्या हस्ते विद्यार्थी पुष्कर तसेच त्याचे मार्गदर्शक शिक्षक श्री निलेश कांदेकर आणि श्री रविंद्र ईटकर यांचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले.
क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त व संघभावना वाढीस लागल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

