( मुंबई )
मुंबई, पुणे आणि घाटमाथा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे मार्गावरील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. खंडाळा घाटात दरड कोसळणे, मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळणे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पाण्याचा वेगाने प्रवाह आणि जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली जाणे अशा घटनांमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
खंडाळा घाटात दरड, रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुसळधार पावसामुळे खंडाळा घाटातील मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे प्रशासनाकडून मार्ग सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून प्रवाशांना संभाव्य विलंबाची सूचना देण्यात आली आहे. मिसिंग लिंकवर दरड तर द्रुतगतीवर पाणी साचले आहे. रेल्वे मार्गावर ही दरड कोसळली आहे. पुणे-मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळलेली आहे. यामुळं हा पर्याय ही चाकरमान्यांसाठी बंद आहे. महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलंय
मिसिंग लिंक प्रकल्पावर स्लॅब कोसळला
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ काँक्रीटचा स्लॅब कोसळल्याने संबंधित मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने परिसर बंद करून तांत्रिक तपासणी सुरू केली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहनांच्या हालचालींवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे, जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग काही ठिकाणी पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकवरील बोगदा क्रमांक २ च्या बाहेर देखील पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. सुरक्षेची खबरदारी म्हणून आज पहाटे ४ वाजेपासूनच या मार्गावरील वाहतूक इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे.
प्रशासनाचे प्रवास टाळण्याचे आवाहन
सततच्या पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव स्थगित करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत नागरिकांनी मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करू नये आणि वाहतूक विभाग, पोलीस तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
मावळ-ताम्हिणी परिसरात पूरसदृश परिस्थिती
लोणावळा, मावळ आणि ताम्हिणी घाट परिसरात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील काही पर्यायी मार्गांवरही पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. पुणे – मुंबई एक्सप्रेस हायवे वर वाहनांची मोठी गर्दी असून लोणावळ्याहून 35 किलोमीटर दूरपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
हे मार्ग तात्पुरते बंद
- मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग : ‘कनेक्टिंग लिंक’ आणि ‘मिसिंग लिंक’ दरम्यानचा मार्ग स्लॅब कोसळल्यामुळे बंद.
- जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग : रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद.
- खंडाळा घाट रेल्वेमार्ग : दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम.
- लोहगड किल्ल्याजवळील पाटण गाव : दरड कोसळल्याची घटना; एका कुटुंबाला फटका बसल्याची प्राथमिक माहिती. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
मुंबईला रेड, पुण्याला यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी रेड अलर्ट, तर पुण्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत ताशी 50 ते 60 किमी वेगाने वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे आणि घाटमाथा परिसरातही पुढील काही तास जोरदार पाऊस कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

