(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई–गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला जात असतानाच हातखंबा परिसरातील नव्याने करण्यात आलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. हातखंबा येथील महाविद्यालयासमोरील तात्पुरत्या डांबरीकरण केलेल्या मार्गावर अवघ्या काही दिवसांत मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सततच्या पावसामुळे या भागातील परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून रस्ता भविष्यात खचण्याची भीती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.
सध्या हातखंबा परिसरात महामार्गाचे काँक्रीटीकरण सुरू आहे. एका मार्गिकेवरील काम सुरू असल्याने वाहतुकीसाठी दुसरी मार्गिका दोन्ही दिशांच्या वाहनांसाठी खुली करण्यात आली आहे. याचदरम्यान नव्याने उभारण्यात आलेला पूलही वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. मात्र, पर्यायी मार्ग आणि नव्या संरचनांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. विशेष म्हणजे, महाविद्यालयाजवळ पुलाखालून नागरिक आणि वाहनांच्या ये-जा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाच्या (बोगद्याच्या) जॉइंटच्या भागातच मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचे पाणी या भागात साचत असल्याने डांबरी थर उखडू लागला असून रस्त्यातील सुटून ग्रीट बाहेर येत आहे. अभियांत्रिकीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या जॉइंट भागातच ही स्थिती निर्माण झाल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पावसाचा जोर असाच कायम राहिला तर या भागातील मातीची धूप आणखी वाढू शकते. त्यामुळे रस्त्याखालचा भराव वाहून जाण्याची आणि पुढील काही दिवसांत रस्ता खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतुकीची मोठी वर्दळ असलेल्या या मार्गावर अशी परिस्थिती कायम राहिल्यास गंभीर अपघात होण्याचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेले डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे ठरत असून पावसाचा पहिलाच मोठा तडाखा सहन करण्यात ते अपयशी ठरले आहे. कोट्यवधी रुपयांच्या महामार्ग प्रकल्पात तात्पुरत्या कामांचाही दर्जा टिकवून ठेवणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात काही दिवसांतच खड्डे पडू लागल्याने महामार्ग प्राधिकरण विभाग आणि ठेकेदार ईगल कंपनीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महामार्ग हा कोकणातील जीवनवाहिनी मानला जातो. पर्यटन, उद्योग, व्यापार आणि दैनंदिन वाहतुकीसाठी हजारो वाहने या मार्गाचा वापर करतात. अशा परिस्थितीत अपूर्ण कामे, निकृष्ट दर्जाचे तात्पुरते डांबरीकरण आणि भुयारी मार्गाजवळील खचण्याची चिन्हे याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे महाविद्यालय परिसरातील खड्डे बुजवावेत, अशी मागणी आता वाहनचालकांसह नागरिकांनी केली आहे.

