(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कसबा जिल्हा परिषद गट प्रभाग समितीची सभा शुक्रवारी आंबेड खुर्द येथील कुणबी भवन येथे पार पडली. मात्र, सभेची माहिती प्रभागातील अनेक गावांपर्यंतच पोहोचली नसल्याने सुरुवातीलाच नागरिकांनी तीव्र आक्षेप घेत प्रशासनाला धारेवर धरले. निमंत्रणाबाबत झालेल्या वादामुळे सभेचे पहिले दीड ते दोन तास गोंधळात गेले, तर काही नागरिकांनी सभा तहकूब करण्याचीही मागणी केली.
कसबा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या विशाखा कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, पंचायत समिती सदस्य सुरेश माईन, तालुका सभापती शर्वरी वेल्ये तसेच विविध गावांचे सरपंच, उपसरपंच आणि विभागीय अधिकारी उपस्थित होते. मात्र, प्रभागातील मोठ्या संख्येने नागरिकांना सभेची माहितीच मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला.
निमंत्रणावरून प्रशासनाची कोंडी
सभेच्या सुरुवातीलाच नागरिकांनी सचिवांकडे निमंत्रणाबाबत जाब विचारला. सुरुवातीला सचिवांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तालुका सभापती शर्वरी वेल्ये आणि उपस्थित नागरिकांनी त्यांची उत्तरे समाधानकारक नसल्याचे सांगत आक्षेप घेतला. अखेर सचिवांनी, “व्हॉट्सॲप ग्रुपवर अधिकाऱ्यांना निमंत्रण पाठवले होते,” असे सांगितल्यावर सभागृहात पुन्हा संतापाची लाट उसळली. केवळ व्हॉट्सॲप संदेशाद्वारे शासकीय सभेचे निमंत्रण देणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी प्रशासनाच्या नियोजनावर टीका केली.
सभेच्या अध्यक्षस्थानी विशाखा कुवळेकर असल्या तरी, संपूर्ण चर्चेदरम्यान संतोष थेराडे हे अधिक सक्रिय दिसून आले. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणे, नागरिकांच्या तक्रारी मांडणे आणि चर्चेचे सूत्र हाताळणे यामध्ये त्यांचा सहभाग अधिक असल्याने सभागृहातही त्याची चर्चा रंगली.
तणावपूर्ण वातावरण शांत करण्यात मध्यस्थी
निमंत्रणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले असताना काही नागरिकांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यावेळी संतोष थेराडे यांनी सचिवांना नियोजनातील त्रुटींवरून सुनावत गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर नागरिकांची समजूत काढत सभा पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
डिंगणी-शास्त्रीपूल-आंबेड रस्त्यावरून अधिकाऱ्यांना धारेवर
सभेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावरही जोरदार चर्चा झाली. डिंगणी-शास्त्रीपूल-आंबेड मार्गालगत गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले चर व्यवस्थित न भरल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली.
यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित रस्ता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे वर्ग झाल्याचे सांगितले. मात्र, जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत संतोष थेराडे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
महावितरणवरही नागरिकांचा संताप
फुणगूस खाडी परिसरातील वीजपुरवठ्याच्या समस्येवरून सामाजिक कार्यकर्ते सुभाष लांजेकर आणि सखाराम थुळ यांनी महावितरणवर टीका केली. अनेक वर्षांपासून जीर्ण वीज खांब आणि वाहिन्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विविध प्रश्नांवर सकारात्मक आश्वासन
यानंतर सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, महावितरण, ग्रामपंचायत आणि शिक्षण विभागाशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांनी प्रलंबित कामे लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
‘यापुढे निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही’
सभेच्या शेवटी अध्यक्षा विशाखा कुवळेकर यांनी सचिवांना पंधरा दिवसांपूर्वीच नियोजनाच्या सूचना दिल्या होत्या, मात्र त्याची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याची खंत व्यक्त केली. “माझ्या कार्यकाळातील ही पहिलीच सभा आहे. यापुढे अशा प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

