(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तीन मुली झाल्याचा राग मनात धरून विवाहितेला मारहाण करत तलाकचा उच्चार करून नाते संपवण्याचा प्रयत्न, त्याचप्रमाणे माहेरहून पैशांची मागणी करत मानसिक व शारीरिक छळ केल्याचा प्रकार रत्नागिरीतील उद्यमनगर-पटवर्धनवाडी येथे समोर आला आहे. या प्रकरणी पतीसह सासू, सासरे आणि आणखी एका नातेवाईक महिलेविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नरगीस सुहेब मणेर (३३, रा. कोकणनगर, इकरा इंग्लिश स्कूलजवळ, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती सुहेब शाहिद मणेर (३५), सासरे शाहिद फकू मणेर (५८), सासू रफिया शाहिद मणेर (५१) आणि सुहेमा ताहिरअली खान (३१, सर्व रा. अल अमीर टॉवर, उद्यमनगर, पटवर्धनवाडी) यांनी २०१६ ते २३ जून २०२५ दरम्यान सतत छळ केला.
पोलिस दिलेल्या माहितीनुसार, पती सुहेब याने ‘तुला तीन मुली झाल्या, म्हणून तू नकोस’ अशा प्रकारची वक्तव्य करत तिला वारंवार शिवीगाळ केली व मारहाण केली. त्याचबरोबर “तलाक, तलाक, तलाक” असे वारंवार उच्चारून वैवाहिक नाते संपवण्याचा प्रयत्नही केला. यासोबतच माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत तिचा मानसिक छळ करण्यात आला.
खटल्यातून माघार घेण्यासाठी दबाव
फिर्यादी नरगीस यांनी याआधी संशयितांविरोधात राजापूर न्यायालयात एक प्रकरण दाखल केले होते. ते प्रकरण मागे घेण्यासाठीही तिच्यावर दबाव आणण्यात आला. यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला, असा आरोप तिने फिर्यादीत केला आहे.
चार जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल
या प्रकरणी चौघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ८५ (कुटुंबातील व्यक्तीकडून छळ), कलम ११५ (२) (खोट्या हेतूने जबरदस्ती), कलम ३५२ (मारहाण), तसेच मुस्लिम महिला (विवाह अधिकारांचे संरक्षण) कायदा २०१९ मधील कलम ४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, पीडितेच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे.