(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील कोतवडे-घारपुरेवाडी येथे दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आजारपणाला कंटाळून एका ६४ वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवारी) सकाळी घडली. माधव विष्णू आठवले असे मृत वृद्धाचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माधव आठवले हे दीर्घकाळापासून आजाराने त्रस्त होते. आजारपणामुळे ते मानसिक तणावात असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घराच्या पडवीत स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्यांनी घरातील व्यक्तींना बंदूक साफ करत असल्याचे सांगितले होते. बंदुकीसंदर्भातील काम असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितल्याने त्यावेळी कोणालाही संशय आला नाही. मात्र काही वेळाने घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा व अन्य कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या घटनेमागील नेमकी कारणे आणि परिस्थितीबाबत अधिक तपास केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार दीर्घकाळाच्या आजारपणातून आलेल्या नैराश्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे कोतवडे परिसरात शोककळा पसरली आहे.

