(चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी)
नऊ वर्षांपूर्वी सुरू झालेले चिपळूणचे बहुचर्चित ‘हायटेक’ बसस्थानक आजही अर्धवट अवस्थेत आहे. सुमारे ५० टक्के काम अद्याप बाकी असल्याने यंदाच्या गणेशोत्सवातही हजारो चाकरमान्यांचे स्वागत अपुऱ्या सुविधांनीच होणार का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. एकीकडे गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून दुसरीकडे पावसाच्या सरी झेलत प्रवाशांना बसची प्रतीक्षा करण्याची वेळ येत आहे. तब्बल नऊ वर्षांचा कालावधी उलटूनही बसस्थानकाचे काम पूर्णत्वास न गेल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चिपळूण हे कोकणातील महत्त्वाचे मध्यवर्ती वाहतूक केंद्र. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुणे आणि राज्याच्या विविध भागांतून हजारो चाकरमानी चिपळूणमार्गे गावाकडे ये-जा करतात. त्यामुळे या काळात बसस्थानकावर प्रचंड गर्दी होते. मात्र, वर्षानुवर्षे प्रवाशांच्या सुविधांचा प्रश्न ‘काम सुरू आहे’ या एका वाक्यातच अडकून पडला आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसस्थानकाची पाहणी करून कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मंत्र्यांच्या पाहणीनंतर तरी काम धडाक्यात सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती पाहता या सूचनांचा परिणाम किती झाला, हा प्रश्नच आहे. पाहणी झाली, सूचना झाल्या; पण कामाची गती मात्र ‘जैसे थे’च असल्याचे चित्र आहे.
हायटेक बसस्थानकाच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालय उभारणीसह अनेक महत्त्वाची कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्याहून गंभीर बाब म्हणजे उर्वरित कामांसाठीची निविदाच अद्याप प्रसिद्ध झालेली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे काम पूर्ण करण्याच्या सूचना एका बाजूला आणि निविदा प्रक्रियाच दुसऱ्या बाजूला, अशी विसंगत अवस्था निर्माण झाली आहे. निविदा निघणार कधी, काम सुरू होणार कधी आणि ते पूर्ण होणार कधी? या प्रश्नांची उत्तरे प्रवाशांना मिळणार तरी कधी, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांची गर्दी वाढणार हे प्रशासनाला आज माहीत झालेले नाही. तरीही प्रवाशांना पावसापासून संरक्षण, बसची प्रतीक्षा करण्यासाठी पुरेशी जागा आणि मूलभूत सुविधा देण्याबाबत अद्याप ठोस तयारी दिसत नाही. बसस्थानकाचे काम असेच रखडले तर यंदाही पावसाच्या सरी अंगावर झेलत बसची वाट पाहण्याची वेळ प्रवाशांवर येण्याची शक्यता आहे. कोकणातील सर्वांत मोठ्या सणाच्या काळात चाकरमान्यांना सुविधा देण्याऐवजी गैरसोयींचा ‘गणपती पॅकेज’ देण्याची वेळ प्रशासनावर येणार नाही ना, अशी उपरोधिक चर्चा सुरू आहे.
नऊ वर्षांचा वनवास कधी संपणार?
एखाद्या प्रकल्पाला नऊ वर्षे लागणे आणि तरीही निम्मे काम बाकी राहणे, ही केवळ प्रशासकीय दिरंगाई नाही तर प्रवाशांच्या संयमाची परीक्षा ठरत आहे. दरवर्षी आश्वासने, पाहणी, सूचना आणि अपेक्षा यांचा खेळ सुरू असतो; मात्र प्रत्यक्षात बसस्थानकाच्या कामाची गती कासवाचीच राहते. गणेशोत्सवाच्या गर्दीचे नियोजन शेवटच्या क्षणी करण्याऐवजी प्रशासनाने आतापासूनच ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. किमान उत्सवापूर्वी प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांची गैरसोय टाळावी, अशी मागणी चाकरमानी आणि प्रवाशांकडून होत आहे.
‘डेडलाइन’ कुठे गायब झाली?
मंत्र्यांच्या पाहणीनंतर कामाला वेग येईल, गणेशोत्सवापूर्वी प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सद्यस्थिती पाहता ही अपेक्षा पुन्हा फोल ठरणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. उर्वरित कामाची निविदा कधी निघणार? प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार? काम पूर्ण होण्याची अंतिम मुदत कोणती? आणि नऊ वर्षांपासून रखडलेले हे ‘हायटेक’ बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत प्रत्यक्षात कधी दाखल होणार? या प्रश्नांची उत्तरे आता केवळ चिपळूणकरांनाच नव्हे, तर दरवर्षी या बसस्थानकातून प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांनाही हवी आहेत. नऊ वर्षांचा कालावधी कमी पडत असेल, तर आणखी किती गणेशोत्सव प्रवाशांनी या अर्धवट बसस्थानकातच काढायचे?

