( राजापूर )
गणेशोत्सवाच्या काळात राजापूर शहरासह संपूर्ण तालुक्यात भाविक आणि वाहनांची मोठी गर्दी उसळते. या वर्दळीमध्ये रस्त्यावर अचानक येणाऱ्या मोकाट जनावरांमुळे अपघाताचा धोका वाढतो. अनेकदा वाहनधारकांचे नियंत्रण सुटून गंभीर अपघातही घडतात. या पार्श्वभूमीवर यंदा विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल, राजापूर यांच्या वतीने एक उपयुक्त आणि अभिनव उपक्रम राबविण्यात आला. शहर व परिसरातील मोकाट गुरांच्या गळ्यात रेडियम बेल्ट बांधून त्यांच्या आणि वाहनधारकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे.
या उपक्रमाचे संयोजन बजरंग दलाचे संयोजक निकेश पांचाळ यांनी केले असून सहसंयोजक म्हणून संदीप मसुरकर यांनी काम पाहिले. गोरक्षा प्रमुख अभिषेक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला. यावेळी विकास वर्मा, नितेश मसुरकर, तन्मय शिवलकर, आदित्य शिवलकर, ऋषी म्हादये, सर्वेश लिंगायत, प्रीतम कांजर, योगेश नाचणेकर, अक्षय घुमे, मार्गेश कदम आणि संकेत आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
रेडियम बेल्टमुळे रात्रीच्या वेळीही रस्त्यावरून जाणारी गुरे दूरवरून स्पष्ट दिसतात. त्यामुळे अपघाताची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होणार असून गुरांची जीवितहानीही टळणार आहे. गणेशोत्सवात रात्रभर वाहतुकीची गर्दी असल्याने या उपक्रमाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.
संयोजक निकेश पांचाळ यांनी सांगितले, “गणेशोत्सव हा आपला मोठा उत्सव असून यात लाखो भाविक सहभागी होतात. वाहनांची गर्दी टाळणे शक्य नसले तरी मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात नक्कीच रोखता येऊ शकतात. यासाठी आम्ही गुरांच्या सुरक्षेसाठी रेडियम बेल्टचा वापर करण्याचा निर्णय घेतला. समाजातील प्रत्येक घटकाची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे.”
गोरक्षा प्रमुख अभिषेक पवार यांनीही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की, “मोकाट गुरांचे प्राण वाचवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. रेडियम बेल्टमुळे गुरे सहज ओळखता येतील व अपघात टाळता येतील. भविष्यात अधिक गुरांना हे बेल्ट लावण्याचा आमचा मानस आहे. गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि एकतेचा उत्सव आहे. यामध्ये सामाजिक सुरक्षा, गोरक्षण आणि अपघात प्रतिबंध हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहेत.”
राजापूर शहरात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले असून वाहनचालकांनाही याचा चांगला फायदा होईल, असे मत व्यक्त होत आहे. भक्ती, समाजहित आणि जनजागृती यांचा सुंदर संगम साधणारी ही कृती गणेशोत्सवातील एक सकारात्मक पाऊल ठरते आहे.

