(राजापूर/ तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील पर्जन्यमापन केंद्राची दुरवस्था समोर आली असून, या केंद्राचा पंचक्रोशीतील शेतकरी आणि नागरिकांना प्रत्यक्षात कितपत फायदा होत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पर्जन्यमापन केंद्र हे परिसरातील पावसाची अधिकृत नोंद ठेवणे, पीकविमा दावे, नैसर्गिक आपत्तीतील नुकसान पंचनामे, कृषी नियोजन तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. मात्र, रायपाटण येथील केंद्राच्या देखभाल आणि कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने या सुविधेचा अपेक्षित लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या मते, पर्जन्यमापन केंद्र नियमित आणि सुस्थितीत कार्यरत राहिल्यास पावसाच्या अचूक नोंदी उपलब्ध होऊन त्याचा फायदा पीकविमा, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर शासकीय योजनांमध्ये शेतकऱ्यांना होऊ शकतो. मात्र, केंद्राची सध्याची अवस्था पाहता त्याच्या कार्यक्षमतेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. यामुळे संबंधित विभागाने रायपाटण पर्जन्यमापन केंद्राची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती, नियमित देखभाल आणि अचूक नोंदींची खात्री करावी, अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.
रायपाटण पर्जन्यमापन केंद्र खरोखरच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रभावीपणे कार्यरत आहे का, याबाबत संबंधित विभागाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

