(रत्नागिरी /प्रतिनिधी)
परदेशी जहाजाच्या ‘पोर्ट क्लिअरन्स’ प्रमाणपत्रासाठी ८० हजार रुपयांची लाच मागून ६० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकलेला महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा (एमएमबी) प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप विलासराव भुजबळ आणि त्याचा खासगी हस्तक मिलिंद तुकाराम बनप या दोघांनाही न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या निकालामुळे बंदर विभागातील भ्रष्ट साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली असून, आता एसीबीच्या तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जयगड बंदरात दुरुस्तीसाठी आलेल्या परदेशी जहाजाची समुद्रात चाचणी घेण्यासाठी परवानगी आणि ‘पोर्ट क्लिअरन्स’ प्रमाणपत्र देण्यासाठी वर्ग-१ अधिकारी संदीप भुजबळ याने तक्रारदार शिपिंग एजन्सीकडे तडजोडीअंती ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील ६० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याची जबाबदारी भुजबळ याने खासगी इसम मिलिंद बनप याच्यावर सोपवली होती. १६ नोव्हेंबर रोजी मारुती मंदिर येथील ‘हॉटेल कार्निवल’मध्ये लाचेची रक्कम स्वीकारून बनप याने भुजबळ यांना फोन करताच एसीबीच्या पथकाने दोघांचाही डाव उधळून लावला. बनप याला रंगेहात पकडल्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी भुजबळ यालाही बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.
या दोन्ही आरोपींना रत्नागिरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, सरकारी पक्षाने तपासाच्या दृष्टीने पोलीस कोठडीची जोरदार मागणी केली. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत दोन्ही आरोपींना दोन दिवसांची १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वर्ग-१ दर्जाच्या अधिकाऱ्यालाच थेट पोलीस कोठडीची हवा खावी लागल्याने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या रत्नागिरी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. या दोघांच्या चौकशीतून बंदर विभागातील आणखी काही ‘बडे मासे’ गळाला लागतात का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.


