(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मणक्याच्या आजारावर उपचार घेऊन घरी परतलेल्या ४३ वर्षीय महिलेची डॉक्टरांकडे जाण्याच्या तयारीत असताना अचानक प्रकृती खालावली. चक्कर येऊन खाली कोसळलेल्या या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. योगिता सूर्यकांत जाधव (वय ४३, रा. आरटीओ कार्यालयाजवळ, कुवारबाव, ता. जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगिता जाधव यांना मणक्याचा आजार असल्याने त्यांच्यावर मारुती मंदिर परिसरातील हिंदू कॉलनी येथील डॉ. दीक्षित यांच्याकडे उपचार सुरू होते. उपचार घेऊन त्या घरी परतल्या होत्या. दरम्यान, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास त्या डॉक्टरांकडे जाण्यासाठी निघाल्या असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि त्या खाली पडल्या.
त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी चिरायू रुग्णालयात नेले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारांसाठी त्यांना सिव्हिल रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सूर्यकांत रामचंद्र जाधव यांनी योगिता यांना रत्नागिरीच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दुपारी १.२८ वाजण्यापूर्वी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३८ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १५०/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे.


