(रत्नागिरी / प्रतिनिधी)
परदेशात पर्यटनासाठी जाण्याचे स्वप्न दाखवत रत्नागिरीतील दोन महिलांची तब्बल १२ लाख ४० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टर्कीमधील इस्तंबूल येथे आकर्षक पर्यटन पॅकेज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून एका कथित टूर कंपनीच्या प्रतिनिधीने ही रक्कम उकळल्याचा आरोप असून, या प्रकरणी दिल्लीतील संशयिताविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थिबा पॅलेस रोड परिसरात राहणाऱ्या समृद्धी सुदेश मयेकर (वय ४५) आणि त्यांच्या मैत्रीण वैभवी विजय खेडेकर यांनी परदेश पर्यटनाचा बेत आखला होता. त्यासाठी त्यांनी ‘Make My Tourx’ नावाने कार्यरत असलेल्या एका कथित टूर कंपनीशी संपर्क साधला. कंपनीचा प्रतिनिधी म्हणून स्वतःची ओळख करून देणाऱ्या संदीप कुमार याने टर्कीतील इस्तंबूल शहरासाठी आकर्षक पर्यटन पॅकेजचे आमिष दाखवत दोघींचा विश्वास संपादन केला. संशयिताच्या सांगण्यानुसार, २४ एप्रिल २०२४ ते ११ जून २०२४ या कालावधीत समृद्धी मयेकर यांनी स्वतःच्या टूर पॅकेजसाठी ५ लाख रुपये, तर वैभवी खेडेकर यांनी त्यांच्या कुटुंबाच्या टूरसाठी ७ लाख ४० हजार रुपये, अशी एकूण १२ लाख ४० हजार रुपयांची रक्कम विविध बँक खात्यांवर ऑनलाइन पद्धतीने जमा केली.
मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतरही टूरचे कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही ना सहलीची व्यवस्था करण्यात आली, ना भरलेली रक्कम परत करण्यात आली. अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर समृद्धी मयेकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी संदीप कुमार (वय ५१, रा. रोहिणी सेक्टर-११, उत्तर-पश्चिम दिल्ली) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३१८(४) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, आर्थिक व्यवहार आणि संबंधित बँक खात्यांचा तपास सुरू केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना ऑनलाइन टूर पॅकेज बुक करताना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही कंपनीकडे पैसे भरण्यापूर्वी तिची अधिकृत नोंदणी, विश्वासार्हता आणि ग्राहकांचे अभिप्राय तपासावेत. सोशल मीडियावरील आकर्षक जाहिराती किंवा अवास्तव सवलतींच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या जाळ्याची धोक्याची घंटा
रत्नागिरीतील नामवंत राजकीय पुढाऱ्यांच्या पत्नीही ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्या, ही बाब केवळ एका गुन्ह्यापुरती मर्यादित नसून सायबर भामट्यांचे जाळे किती व्यावसायिक आणि धोकादायक बनले आहे, याचे उदाहरण मानले जात आहे. शिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समाजात प्रभावी स्थान असलेल्या व्यक्तींनाही अशा फसवणुकीला सामोरे जावे लागत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांची अवस्था काय असू शकते, असा प्रश्न या घटनेनिमित्त उपस्थित होत आहे. या प्रकरणामुळे ऑनलाइन व्यवहार करताना केवळ आकर्षक ऑफर पाहून निर्णय घेणे किती धोकादायक ठरू शकते, याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे. कोणतीही टूर कंपनी अधिकृत आहे का, तिची नोंदणी, कार्यालयाचा पत्ता, ग्राहकांचे अभिप्राय आणि व्यवहाराची विश्वासार्हता तपासल्यानंतरच आर्थिक व्यवहार करावेत, असा संदेशही या घटनेतून अधोरेखित झाला आहे.

