(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातल्या रायपाटण गावचा सुपुत्र कु. सूरज सुभाष नारकर याची रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात निवड झाली असून गावात त्याचे उत्स्फूर्त आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. होळीचा मांड येथे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि भव्य मिरवणुकीतून त्याचा सन्मान करण्यात आला.
सूरज नारकर हा रायपाटणमधील बागवाडीचा रहिवासी असून त्याची आईदेखील रत्नागिरी पोलीस दलात कार्यरत आहे. लहानपणापासून पोलीस सेवेत जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या सूरजने सातत्याने मेहनत घेतली. त्याच्या या जिद्दीला यश मिळत तो जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेत यशस्वी ठरला.
त्याच्या निवडीमुळे रायपाटण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वीच खाडेवाडी येथील हरिओम शिंदे याची इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) मध्ये निवड झाली होती. आता पुन्हा एकदा पोलीस दलात स्थान मिळाल्याने गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सोमवारी सायंकाळी सूरज गावात दाखल होताच ग्रामस्थांनी त्याचे जोरदार स्वागत करत मिरवणूक काढली. सुहासिनींनी पारंपरिक औक्षण करून शुभेच्छा दिल्या. गावकऱ्यांनी सूरज नारकर याचे अभिनंदन करत त्याच्या पुढील सेवाभावी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

