(लांजा/ रत्नागिरी)
घराच्या अंगणात कचरा साफ करीत असताना अचानक चक्कर येऊन पडलेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा रत्नागिरीतील सिव्हिल रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू झाला. श्रीधर गंगाराम पराडकर (वय ६५, रा. केळवली, पो. सालपे, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास श्रीधर पराडकर हे आपल्या घराच्या अंगणात कचरा साफ करीत होते. यावेळी अचानक त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यांना उलटीचाही त्रास झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने त्यांना उपचारासाठी शिपोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणीनंतर पुढील उपचारांसाठी रत्नागिरीतील सिव्हिल रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांचे चुलत भाऊ रविंद्र शाताराम पराडकर यांनी श्रीधर यांना रत्नागिरी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून १६ नोव्हेंबर रोजी रात्री १०.४० वाजता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची सुरुवातीची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी रात्री १०.०२ वाजता लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ६०/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.


