(राजापूर / तुषार पाचलकर)
दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मौजे राजवाडी (ब्राह्मणवाडी साईमंदिर समोर, ता. संगमेश्वर) येथे गस्तीदरम्यान वनविभागाने शिकारीच्या उद्देशाने फिरणारे एक बोलेरो पिकअप वाहन (MH-08 AP-8621) थांबवून तपासणी केली असता मोठा मुद्देमाल हाती आला.
गाडीच्या टपावर बसून हँड टॉर्चचा प्रकाश टाकून वन्य प्राण्यांच्या शोधात असलेल्या या वाहनातून १२ बोअर बंदूक १, जिवंत काडतुसे ६, हँड टॉर्च २ आणि अन्य साहित्य मिळून आले. या कारवाईत ४ संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून बोलेरो वाहनासह सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:
विश्वनाथ शांताराम मालप (२९), रा. अणदेरी
गजानन मानसिंग इंदुलकर (४३), रा. हेदली
रुपेश धोंडू पोमेंडकर (४१), रा. कारभाटले
राहुल रविंद्र गुरव (२८), रा. तिवरे घेरा प्रचितगड
सदर प्रकरणी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर जी. गुरुप्रसाद (भा.व.से), विभागीय वनाधिकारी रत्नागिरी-चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई, तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार, वनपाल सागर गोसावी (संगमेश्वर-देवरुख), वनरक्षक सुरज तेली, आकाश कडूकर, सहयोग कराडे, सुप्रिया काळे, यांचा समावेश होता. याशिवाय पोलीस पाटील अणदेरी महेंद्र होडे, राजवाडी पोलीस पाटील विलास राऊत, सुलतान मालगुंडकर आणि अनंत तोरस्कर यांनीही महत्त्वाचे सहकार्य केले.
वनविभागाचे आवाहन:
“ शिकार अथवा अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली आपल्या परिसरात आढळल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ वर संपर्क साधावा,” असे आवाहन विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांनी केले आहे.

