(राजापूर)
हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, राजापूर यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवीभक्तांसाठी नवदुर्गा दर्शन यात्रा मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सहकार्याने ही यात्रा आयोजित करण्यात आली असून, यामार्फत राजापूर व रत्नागिरी तालुक्यातील नवदुर्गा तसेच कोल्हापूरच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी देवीचे व छत्रपती घराण्यातील श्री भवानी देवीचे दर्शन लाभणार आहे.
यात्रेची सुरुवात काल गुरुवार, दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थ येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण व वंदन करून करण्यात आली. यानंतर राजापूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्री संदीप मालपेकर, राजापूर महिला पतपेढीच्या अध्यक्षा सौ. श्रुतीताई ताम्हणकर, माय राजापूर संस्थापक श्री प्रदीप कोळेकर, आणि श्री कुलदीप लांजेकर यांच्या हस्ते गाड्यांचे विधिवत पूजन व श्रीफळ वाढवून यात्रेचा शुभारंभ झाला.
या यात्रेच्या माध्यमातून राजापूर तालुक्यातील – पेंडखळेची श्री जाकादेवी, देवी हसोळची श्री आर्या दुर्गा, भालावलीची श्री नवदुर्गा, आडीवरेची श्री महाकाली, नाट्याची श्री नवलादेवी, होळीची श्री भरतदुर्गा, मिठगवाण्याची श्री मुहुर्तादेवी आणि विलयाची श्री दुर्गादेवी अशा नऊ नवदुर्गांचे दर्शन होत आहे.
तसेच रत्नागिरी तालुक्यातील – आडीवरेची महाकाली, गावखडीची जुगाई, मेर्वी व पावस येथील नवलादेवी, कोळंबेतील त्रिमुखीदेवी, नाचणेतील नवलादेवी व पावणादेवी, खेडशीची महालक्ष्मी, झाडगावची जुगाई व पेठ किल्ल्यातील श्री भगवती देवी अशा नवदुर्गांच्या दर्शनाचे विशेष आयोजन यावर्षी करण्यात आले आहे.
या यात्रेची खास वैशिष्ट्ये म्हणजे सुरक्षित प्रवास, विमा संरक्षण, चहा-नाश्ता, शाकाहारी जेवण, सायंकाळी चहा, माफक दरात सेवा तसेच महिला भाविकांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने साडीचे बक्षीस अशी आहेत.
यात्रेच्या शुभारंभप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर, उपाध्यक्ष विवेक गुरव, कार्याध्यक्ष मंदार बावधनकर, खजिनदार प्रसन्न देवस्थळी, सचिव निकेश पांचाळ व कार्यकर्ते मोहन घुमे, संदीप मसुरकर, निखील चव्हाण, नम्रता बावधनकर आदी उपस्थित होते.
एकाच दिवशी नऊ नवदुर्गांचे दर्शन घेणे सामान्य भक्तांसाठी शक्य नसते. हे लक्षात घेता, कोणताही आर्थिक लाभ न घेता फक्त सेवाभावाने ही यात्रा जुजबी शुल्कात आयोजित करण्यात आली आहे. देवीभक्तांनी या अलौकिक दर्शनाचा लाभ घ्यावा, असा संदेश आयोजकांनी दिला आहे. श्रद्धा, संस्कृती आणि सेवाभाव यांचा संगम साधणाऱ्या या यात्रेमुळे आदिशक्तीच्या दर्शनाचा अनुभव भाविकांना लाभणार आहे.

