(संगमेश्वर / एजाज पटेल)
शास्त्रीपूल-आंबेड-डिंगणी या मुख्य मार्गावर सीएनजी पाईपलाईन टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामानंतर रस्त्यालगतच्या साईडपट्ट्या योग्य प्रकारे पूर्ववत न केल्याने हा मार्ग अपघातप्रवण बनला आहे. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात चिखल आणि खचलेली माती निर्माण झाली असून, दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मोठी दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
शास्त्रीपूल-आंबेड-डिंगणी हा मार्ग आधीच अरुंद असून या मार्गावरून एसटी बस, अवजड वाहने तसेच लहान वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सीएनजी पाईपलाईनसाठी रस्त्याच्या कडेला चर खोदण्यात आला होता. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर साईडपट्टीची योग्य दुरुस्ती किंवा मजबुतीकरण करण्यात आले नाही. केवळ माती टाकून ती बुजवण्यात आल्याने पावसामुळे ती जागा चिखलमय झाली आहे.
यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना चालकांना आपली वाहने रस्त्याच्या कडेला उतरवावी लागतात. मात्र, भुसभुशीत माती आणि चिखलामुळे अनेक वाहने रुतून बसत आहेत. परिणामी, वाहतूक खोळंबणे, अपघात आणि नागरिकांची गैरसोय ही नित्याची बाब बनली आहे.
याच दुरवस्थेचा फटका आज उंबरे येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र जाधव यांनाही बसला. ते आपल्या वाहनाने या मार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना त्यांच्या वाहनाची पुढील दोन्ही चाके रस्त्यालगतच्या चिखलात रुतली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहन बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठी कसरत करावी लागली. महेंद्र जाधव यांच्याप्रमाणे अनेक वाहनचालकांना दररोज अशाच धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची असताना या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे रस्त्यालगतच्या खचलेल्या साईडपट्ट्यांचे तातडीने खडीकरण करून मजबुतीकरण करावे, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची भीती असल्याचा इशाराही वाहनचालक आणि प्रवाशांनी दिला आहे.

