(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळील विघ्रवली येथील पालकर फार्मवर उद्योजक विजय पालकर व सौ. पालकर यांच्या पुढाकारातून शेतकरी प्रोत्साहन व सेंद्रिय शेती अभियानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना युयुत्सु आर्ते यांनी सेंद्रिय शेती, बांबू लागवड आणि शेतीतील आर्थिक नियोजनाचे महत्त्व स्पष्ट केले. शेती करताना खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ ठेवूनच निर्णय घ्यावेत, असे सांगत त्यांनी कोकणातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. बांबू लागवड ही कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती असून, एकदा लागवड केल्यानंतर दीर्घकाळ चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले.
कोकणातील युवकांनी रोजगारासाठी शहरांकडे धाव घेण्यापेक्षा आपल्या मातीत आधुनिक शेती करून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविण्याची क्षमता आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आनंद बोंद्रे यांनी सेंद्रिय व नियोजनबद्ध शेतीचे महत्त्व पटवून देताना योग्य खत व्यवस्थापन, वेळेवर फवारणी आणि वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते, असे सांगितले.
मंडळ अधिकारी पाटक यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली. तसेच गटशेतीमुळे उत्पादनवाढीसह खर्चात बचत होऊ शकते, असे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
गटविकास अधिकारी लोकरे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. कृषी विभागाच्या यादव मॅडम यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी अडचणी आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
सौ. पालकर यांनी मुंबई ते विघ्रवली या प्रवासाचा अनुभव सांगत पालकर फार्ममध्ये वरिष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि पर्यावरणपूरक शेतीची गरज त्यांनी अधोरेखित केली.
विजय पालकर यांनी पालकर फार्ममध्ये कॉफी लागवडीचा यशस्वी प्रयोग सुरू असल्याची माहिती देत शेतकऱ्यांनी नव्या पिकांकडेही वळावे, असे आवाहन केले. जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
रानभाज्यांवर पीएच.डी. करणारे आतिश माईनके यांनी रानभाज्यांच्या सुमारे ८० प्रकारांची माहिती दिली. विविध दुर्मिळ रानभाज्यांचे बियाणे व रोपे संवर्धित करण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन कृष्णा पालकर यांनी केले. या अभियानाला संगमेश्वर तालुक्यातील अनेक शेतकरी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

