(साखरपा / भरत माने)
महावितरणच्या कारभाराचा फटका साखरपा परिसरातील वीज ग्राहकांना बसत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वेळेवर वीज मीटरचे रीडिंग न घेतल्याने सलग दोन महिन्यांची बिले सरासरी (Average) पद्धतीने आकारण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेतल्यानंतर मागील कालावधीतील वीज वापर एकत्रितपणे एका बिलात आकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
मीटर रीडिंग वेळेवर घेणे ही महावितरणची जबाबदारी असताना त्यातील विलंबाचा आर्थिक फटका ग्राहकांना का सहन करावा, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दोन महिन्यांचे सरासरी बिल भरल्यानंतर प्रत्यक्ष रीडिंगच्या आधारे मोठ्या प्रमाणात युनिट्स एकाच बिलात जमा झाल्याने काही ग्राहकांना जास्त रकमेची बिले मिळत आहेत. एकाच बिलात अधिक युनिट्स दाखल झाल्याने उच्च वीज वापराचा स्लॅब लागू होऊन बिलाची रक्कम वाढण्याची शक्यता असल्याने ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, ज्या महिन्यांत सरासरी पद्धतीने वीज बिल आकारण्यात आले, त्या बिलांची रक्कम ग्राहकांनी भरली असल्यास प्रत्यक्ष रीडिंगनंतर तयार झालेल्या बिलात त्या रकमेचे योग्य समायोजन (Adjustment/Credit) करण्यात आले आहे का, याबाबतही ग्राहकांना स्पष्ट माहिती मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे बिलातील युनिट्स, आधी भरलेली रक्कम आणि प्रत्यक्ष वापर यांचा नेमका हिशोब काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
‘हिशोब पारदर्शक द्या’
साखरपा परिसरातील ग्राहकांची मागणी स्पष्ट आहे की, महावितरणने अशा सर्व बिलांची तातडीने फेरतपासणी करावी. सरासरी बिलिंग झालेल्या महिन्यांतील युनिट्स, प्रत्यक्ष मीटर रीडिंग, ग्राहकाने आधी भरलेली रक्कम आणि त्यानंतर करण्यात आलेले समायोजन यांचा संपूर्ण तपशील ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा.
तसेच प्रत्यक्ष वीज वापराचा कालावधी लक्षात घेऊन युनिट्सचे महिनानिहाय विभाजन करून संबंधित कालावधीतील लागू दर आणि स्लॅबनुसार बिलांची पुनर्गणना करावी, अशी मागणी होत आहे. मीटर रीडिंग घेण्यास झालेल्या विलंबामुळे ग्राहकांवर जादा स्लॅबचा आर्थिक भार पडला असल्यास तो दूर करून आवश्यकतेनुसार सुधारित बिले देण्यात यावीत, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.
नियमित मीटर रीडिंगची मागणी
मीटर रीडिंग नियमित आणि वेळेवर घेण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही ग्राहकांकडून होत आहे. रीडिंग घेण्यात विलंब झाल्यानंतर सरासरी बिल देणे आणि त्यानंतर एकत्रित वापराचे मोठ्या रकमेचे बिल ग्राहकांच्या हातात देणे हा प्रकार थांबवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
‘मग साखरपा कार्यालय काय कामाचे?’
दरम्यान, वीज बिलामध्ये काही समस्या असल्यास किंवा बिलाची दुरुस्ती करायची असल्यास ‘देवरुख कार्यालयात जा’ असे सांगितले जात असल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली आहे. त्यामुळे साखरपा येथे महावितरणचे कार्यालय असताना स्थानिक ग्राहकांच्या समस्या तेथेच का सोडविल्या जात नाहीत, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
साखरपा परिसरातील वीज ग्राहकांच्या समस्येची महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित बिलांची तपासणी करावी. जादा आकारणी झाल्याचे आढळल्यास ती रक्कम पुढील बिलात समायोजित करावी किंवा आवश्यक ती दुरुस्ती करून ग्राहकांना सुधारित बिले द्यावीत, अशी मागणी होत आहे. अन्यथा या प्रश्नावर ग्राहकांना संघटितपणे आवाज उठवावा लागेल, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

