(मुंबई)
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्वांटम कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, खाण संशोधन आणि डेटा सेंटरसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या परदेशी गुंतवणुकीची संधी निर्माण होत आहे. या क्षेत्रांमध्ये कॅनडातील क्युबेक प्रांतासोबत भागीदारी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी (३ जुलै) विधानभवनात कॅनडातील क्युबेक प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार मंत्री क्रिस्टोफर स्किट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत दोन्ही बाजूंनी गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि औद्योगिक सहकार्याच्या विविध संधींवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी राज्याचे शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.
AI, Quantum Computing आणि Cyber Security वर विशेष भर
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा आणि खाण संशोधन ही भविष्यातील अर्थव्यवस्थेला दिशा देणारी क्षेत्रे आहेत. महाराष्ट्र आणि क्युबेक यांच्यातील भागीदारीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
२०१८ च्या सामंजस्य कराराची आठवण
मुख्यमंत्री म्हणाले की, २०१८ मध्ये मॉन्ट्रियल दौऱ्यादरम्यान माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीकरणीय ऊर्जा, जैवतंत्रज्ञान आणि आदिवासी कल्याण या क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले होते. त्या करारांमुळे महाराष्ट्र आणि क्युबेक यांच्यातील संबंध अधिक मजबूत झाले असून आता या सहकार्याचा विस्तार करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच, नुकत्याच झालेल्या भेटीत कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबतही महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधींबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
क्युबेकची महाराष्ट्रात गुंतवणुकीची तयारी
क्युबेकचे आंतरराष्ट्रीय व्यवहार मंत्री क्रिस्टोफर स्किट यांनी सांगितले की, क्युबेक हा कॅनडातील प्रगत औद्योगिक प्रदेश असून कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, शिक्षण आणि क्रिटिकल मिनरल्स क्षेत्रात मोठी क्षमता आहे. त्यांनी सांगितले की, क्युबेकमधील पेन्शन फंड संस्थांच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची तयारी असून महाराष्ट्रासोबत विविध क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन भागीदारी करण्यास क्युबेक उत्सुक आहे.
या बैठकीला उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबळगन, राजशिष्टाचार विभागाचे सचिव राजेश गवांदे, क्युबेक प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार सहाय्यक उपमंत्री डॉमिनिक मार्कोट्टे, सल्लागार लिया फर्टीन, संचालक मायकल कॉन्स्टेनिन, स्टीफन फलेक्कर तसेच सीडीपीक्यू (CDPQ) या गुंतवणूक संस्थेचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक नटराजन वेंकटरमण यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

