(गुहागर / वार्ताहर)
गुहागर तालुक्यातील बुधल समुद्रकिनारी आज दोन मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. समुद्रकिनाऱ्यावरील खडकाळ भागात फिशिंग रॉडच्या सहाय्याने मासेमारी करत असताना दोघेही समुद्राच्या पाण्यात वाहून गेले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे चिपळूणसह गुहागर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथील रहिवासी जावेद सुर्वे आणि सलीम पटेल या दोघांचे मृतदेह गुहागर तालुक्यातील बुदल समुद्रकिनारी आढळून आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोघेही बुधल बीचवरील खडकाळ भागात किंवा समुद्रकिनारी मासेमारी करण्यासाठी गेले होते. मात्र, समुद्रातील लाटांचा वेग, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्यात वाहून गेले असावेत. त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, बुधल गावातील ग्रामस्थांना समुद्रकिनारी दोघे वाहून आल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी सभापती प्रणव पोळेकर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोळेकर यांनी विलंब न करता घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. तसेच त्यांनी पोलिस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून पुढील मदतकार्य व कार्यवाहीसाठी आवश्यक यंत्रणा घटनास्थळी बोलावून घेतली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मृतांची ओळख पटविण्यात आली असून दुर्घटना नेमकी कशी घडली, याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील खडकाळ भागात मासेमारी करताना सुरक्षिततेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः समुद्राला उधाण असताना लाटांचा वेग आणि पाण्याचा प्रवाह अचानक बदलू शकतो. या दुर्घटनेमुळे समुद्रकिनारी मासेमारी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्यांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.


