( संगमेश्वर / प्रतिनिधी )
भगवान परशुरामांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या आणि निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणच्या नकाशावर ‘सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट’ हे नाव आज सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे. पण हा प्रवास सोपा नव्हता. १९९३ पूर्वीच्या काळात, जेव्हा तंत्रज्ञान बाल्यावस्थेत होते आणि ग्रामीण भागात कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत संकुचित होता, अशा खडतर परिस्थितीत या महाविद्यालयाची स्थापना झाली. शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या दूरदृष्टीने आणि सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या कलावृक्षाचे बीज रोवले गेले. निकम साहेबांनी लावलेल्या या रोपट्याला खतपाणी घालून त्याचा वटवृक्ष करण्याचे ऐतिहासिक कार्य कोकणातील प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के (लाडके पप्पा सर) आणि त्यांच्या पत्नी श्रीमती युगंधरा राजेशिर्के यांनी केले.
सुरुवातीच्या काळात ग्रामीण भागातील गरीब, मागासवर्गीय आणि कलेची भूक असलेल्या मुला-मुलींना एकत्र करणे हे मोठे आव्हान होते. निकम साहेब नेहमी राजेशिर्के सरांना म्हणायचे, “तुम्ही विद्यार्थी आणा, मग कला महाविद्यालय सुरू करू!” राजेशिर्के सरांनी खेडोपाडी फिरून विद्यार्थी गोळा केले. सुरुवातीला बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी आणि त्यातही मुलींची संख्या नगण्य होती. परंतु, हळूहळू कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांचा ओघ वाढू लागला.स्व. गोविंदराव निकम, स्वर्गीय अनुराधाताई निकम, शेखर निकम, प्रा. प्रकाश राजेशिर्के, युगंधरा राजेशिर्के यांच्या अथक परिश्रमांतून ही संस्था उभी राहिली.
प्रा. राजेशिर्के सरांनी पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन निसर्गातील पोत, रंग आणि आकार अनुभवण्याचे भौतिक शिक्षण दिले. सुरुवातीच्या काळात प्रा. संजय सावंत आणि प्रा. आशुतोष आपटे यांनी अत्यंत तोकड्या पगारात ही जबाबदारी पेलली. पुढे प्रा. अनिल अभंगे, प्रा. होळकर, प्रा. रणजीत गौड यांनीही मोलाचे अध्यापन केले.
त्या काळात संगणक किंवा मोबाईल नसल्यामुळे बाहेरील जगातील कलाकृती पाहणे कठीण होते. यावर तोडगा म्हणून सरांनी दिग्गज कलावंतांच्या कार्यशाळा, स्लाईड शो आणि राज्यस्तरीय स्पर्धा सुरू केल्या. २०१३ मध्ये या महाविद्यालयाने मुंबईच्या जगप्रसिद्ध ‘जहांगीर आर्ट गॅलरी’मध्ये प्रदर्शन भरवून इतिहास घडवला. यात शिवाजी तुपे, वासुदेव कामत, सुहास बहुलकर, जी. एस. माजगावकर अशा दिग्गजांच्या कलाकृती मांडल्या गेल्या. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात (१९९३ ते २०१७) ५५ चित्रकार-शिल्पकारांची शिबिरे आयोजित करण्यात आली होती.
आज संस्थेच्या कलादालनात १००० हून अधिक चित्रांचा आणि शिल्पांचा अमूर्ता कल्पक संग्रह आहे, जो पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात. तसेच ३००० हून अधिक ग्रंथांचे समृद्ध वाचनालय आणि अद्ययावत संगणक कक्ष विद्यार्थ्यांना जागतिक घडामोडींशी जोडून ठेवतो.
आजच्या यांत्रिक आणि धावपळीच्या युगात आपण मुलांच्या नैसर्गिक कलागुणांची गळचेपी करत आहोत का? हा विचार करण्याची वेळ आली आहे. बालपणी रंगांशी खेळणाऱ्या मुलांना मोठे झाल्यावर डॉक्टर, इंजिनिअर बनवण्याच्या स्पर्धेत ढकलले जाते. पालकांच्या मनाविरुद्ध आणि स्वतःच्या इच्छेविरुद्ध मुले यांत्रिक बनतात. आर्थिक स्थैर्य मिळत असले तरी मनाचे समाधान हरवून जाते. त्यांच्यातील दडलेला कलाकार आयुष्यभर एका कोपऱ्यात खंत व्यक्त करत राहतो.
कलेकडे केवळ एक फावल्या वेळचा ‘छंद’ म्हणून न बघता एक व्यावसायिक आणि सन्मानजनक करिअर म्हणून पाहण्याची गरज आहे. आज २१ व्या शतकात कला क्षेत्रात इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा जास्त आर्थिक सुबत्ता आणि कीर्ती मिळवता येते, हे पालकांनी समजून घेतले पाहिजे. जगात असे अनेक देश आहेत जिथे सोन्याऐवजी जागतिक दर्जाची चित्रे तारण ठेवून बँका कोट्यवधींचे कर्ज देतात, यावरूनच कलेचे आर्थिक मूल्य अधोरेखित होते.
सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी आज केवळ भारतातच नव्हे, तर सातासमुद्रापार आपल्या कलेचा डंका वाजवत आहेत. बॉम्बे आर्ट सोसायटी आणि महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात दरवर्षी येथील ४-५ विद्यार्थी मानाचे पुरस्कार पटकावतात. राष्ट्रीय पातळीवर प्रवीण मिसाळ आणि रोहन पवार यांनी मिळवलेले यश याचेच प्रतीक आहे.
हे महाविद्यालय केवळ रंग आणि रेषा शिकवत नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा रुजवते. येथे असणारे मूलभूत अभ्यासक्रम (Foundation) -१वर्ष, कला शिक्षक पदविका (ATD)- २ वर्ष, रेखा व रंगकला (Painting)-३वर्ष, शिल्प व प्रतिमानबंध कला (Sculpture) -३वर्ष आणि आर्ट मास्टर (AM)-(सुट्टीतील अभ्यासक्रम)-३वर्ष या विभागांद्वारे पेन्सिल पकडण्यापासून ते मानवी शरीराच्या अचूक रेखाटनापर्यंतचे शास्त्रोक्त शिक्षण दिले जाते.
कला क्षेत्राव्यतिरिक्त चित्रपट, नाट्य, संगीत क्षेत्रातील अष्टपैलू कलावंत येथे वारंवार भेट देत असल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. निसर्गरम्य आवारात, मोकळ्या मैदानावर आणि भव्य ऑडिटोरियमच्या छत्राखाली शिकताना विद्यार्थी निसर्गाशी आणि समाजाशी घट्ट जोडले जातात. म्हणूनच, सावर्डे येथील ‘सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट’ हे केवळ एक कला महाविद्यालय नसून, मानवी मूल्यांची जोपासना करणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे महाराष्ट्रातील एक आदर्श आणि अद्वितीय कलापीठ आहे.

