(देवरूख / सुरेश सप्रे)
माजी पंचायत समिती सभापती व काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दिलीप पेंढारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वगृही परतले असून त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे संगमेश्वर तालुक्यात उबाठा पक्षाला उभारी मिळाली असून मुचरी व कसबा गटातील उबाठाची ताकद वाढली असल्याचा दावा केला जात आहे.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा संघटक संतोष थेराडे, संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, उपतालुका प्रमुख मनीषा बने, तसेच प्रकाश घाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यातील अनेकांना शिवसेनेने मोठे केले. त्यातील काहीजण स्वार्थासाठी इतर पक्षात गेले असले तरी खरे शिवसैनिक व मतदार आजही पक्षासोबत ठामपणे उभे आहेत.असे उप तालुका प्रमुख प्रकाश घाणेकर यांनी सांगत आगामी निवडणुकांमध्ये संगमेश्वर पंचायत समितीवर भगवा फडकविण्यासाठी अधिक जोमाने लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना नेते माजी राज्यमंत्री रवींद्र माने हे पक्षाच्या पडत्या काळात पक्षाला उभारी देण्यासाठी वयाचा व तब्बेतीचा विचार न करता सर्वांना बरोबर घेत पक्षवाढीसाठी जे काम करत आहेत त्याने मी प्रेरित झालो आहे. सध्याच्या राजकारणातील घडामोडींविषयी अस्वस्थता आहे. शिवसेनेच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याच्या उद्देशानेच मी स्वगृही प्रवेश घेतला आहे, असे दिलिप पेंढारी यांनी स्पष्ट केले.
शिवसेना हा सामान्य कार्यकर्त्याला मोठ्या पदापर्यंत पोहोचवणारा पक्ष असल्याचे सांगितले. पक्षात गद्दारी झालेल्या काळात रवींद्र माने यांनी संघटना सावरण्याचे काम केले. अनेक जण उबाठाशी जोडले जात आहेत. आगामी निवडणुकीत संगमेश्वर तालुक्याचा सभापती पुन्हा भगव्या झेंड्याखालीलच असेल असा विश्वास जिल्हा संघटक संतोष थेराडे व्यक्त केला.
जिल्हासह संगमेश्वर तालुक्यात उबाठा शिवसेना पुन्हा जोमाने उभी राहत असून जनता गद्दारांना धडा शिकविण्यासाठी अधीर असल्याचे प्रतिपादन जिल्हा प्रमुख दत्ता कदम यांनी केले.

