( संगमेश्वर )
ढोल-ताशांचा गजर, ग्रामदेवतेच्या नावाचा जयजयकार करत संगमेश्वर तालुक्यातील शिवने व करंबेळे गावच्या सीमेवर ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा अनोखा सोहळा आज १५ मार्च रोजी रंगला. हा भव्यदिव्य सोहळा म्हणजेच दोन बहिणींच्या भेटीचा शिमगोत्सव पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी मोठी जत्राही भरली होती.
शिवने – करंबेळे येथील सीमेवर देवरुख – संगमेश्वर मार्गावर पालख्यांची आगळीवेगळी भेट पाहण्यासाठी हजारो भक्तगण आज उपस्थित होते . ही पालख्यांची भेट म्हणजे केवळ दोन गावातीलच नव्हे, तालुक्यातीलच नव्हे , तर जिल्ह्यातील भक्तगणांसाठी एक पर्वणी असते. आजूबाजूच्या गावातील शिमगोत्सव संपन्न झालेले असल्याने करंबेळे व शिवने गावच्या सीमेवर होणारी पालख्यांची भेट पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळते. शिवने गावच्या पालखीतील ग्रामदेवता रवळनाथ, नवलाई, व पावणाई असून करंबेळे गावच्या पालखीत ग्रामदैवत गांगोबा, देवी निनावी व वाघजाई अशा देवता आहेत.
आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन्ही गावातील पालख्या वाजत गाजत जल्लोषात सीमेवर आणण्यात आल्या. त्यानंतर या पालख्या भेटीपूर्वी मनसोक्त नाचविल्या गेल्या. यावेळी दोन्ही पालख्यांची भेट घडवून आणताना भक्तगण आपल्या खांद्यावर भक्तांना उभे करून त्यांच्या खांद्यावर दोन्ही पालख्या देतात व ही अनोखी भेट घडवून आणली जाते. या वर्षी ही भेट दुपारी ३.१५ वाजण्याच्या दरम्यान घडली. भेटी दरम्यान पालख्या जड येतात, असेही सांगितले जाते.करंबेळे शिवने पालख्या भेटींची ही परंपरा साडेतीनशे वर्षांपूर्वी पासूनची असल्याचे मानकरी सांगतात. तसेच पूर्वी करंबेळे आणि शिवने हे दोन गाव एकच होते. राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंडात हे दोन गाव वेगळे झाल्यापासून त्या गावातील देवींची म्हणजेच बहिणींची भेट घडविण्याची प्रथा असल्याचे सांगितले जाते.
या उत्सवा दरम्यान मार्गाच्या दुतर्फा व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली होती. सुमारे एक दीड किलोमीटर लांब एवढी मोठी यात्रा भरली होती.आबाल वृद्धांनी या पालखी भेट सोहळ्याचा आनंद लुटला. दरम्यान सोहळ्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये , मार्गावर वाहतुकीमध्ये कोणताही अडथळा होऊ नये यासाठी देवरुख व संगमेश्वर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .