(दापोली /रत्नागिरी)
कोकणातील महत्त्वाच्या पर्यटन मार्गांपैकी एक असलेल्या खेड–दापोली महामार्गावरील नव्याने करण्यात आलेल्या रस्ते व मोरी बांधकामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मोऱ्या खचणे, रस्ते बसणे आणि मोठी भगदाडे पडण्याच्या घटना समोर आल्याने वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. या मार्गावरील वाढत्या अपघातांमुळे सुरक्षिततेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.
महामार्गावरील एका नव्याने बांधलेल्या मोरीलगतचा रस्ता खचून मोठे भगदाड निर्माण झाले असून, सततच्या पावसामुळे त्याचा विस्तार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अथवा मुसळधार पावसात या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी हा भाग जीवघेणा ठरू शकतो, अशी चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. याशिवाय मल्हार पेट्रोल पंप परिसर, नवानगर, नवानगर–महालक्ष्मी मार्ग, टाळसूरे मेडिकल कॉलेज बसथांबा तसेच कुंभवे जिल्हा परिषद शाळेजवळील पुलाच्या परिसरात रस्ता खचल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व ठिकाणी तातडीने दुरुस्तीची आवश्यकता असून, विलंब झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान, या मार्गावर गेल्या काही दिवसांत अपघातांची मालिकाच सुरू आहे. कुंभवे कातळ–नवशी पाटी दरम्यान पुलावर भरधाव कार कठड्याला धडकली, तर त्यापूर्वी कुंभवे शाळेसमोरील उघड्या गटारामुळे अल्टो कारचा अपघात झाला होता. याशिवाय टाळसूरे–नवानगर परिसरात रस्त्यालगत ठेवलेल्या मोरीच्या पाइपवर कार धडकल्याची घटनाही घडली आहे. सुदैवाने या सर्व घटनांत जीवितहानी टळली असली, तरी परिस्थितीची गंभीरता अधोरेखित झाली आहे.
रस्ते बांधकाम सुरू असलेल्या अनेक ठिकाणी आवश्यक ते इशारा फलक, परावर्तित चिन्हे, बॅरिकेड्स आणि रात्री दिसणारी चेतावणी व्यवस्था पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. परिणामी, धोकादायक वळणे, पुल किंवा खचलेल्या रस्त्यांची माहिती वाहनचालकांना वेळेत मिळत नसल्याने अपघातांचा धोका अधिक वाढत आहे. कोकणातील प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या या महामार्गावर वर्षभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. अशा महत्त्वाच्या मार्गावरील नव्याने उभारलेल्या मोऱ्याच अल्पावधीत खचू लागल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची तांत्रिक चौकशी करून निकृष्ट काम झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि संबंधित ठेकेदारांनी खचलेल्या सर्व ठिकाणांची तातडीने संयुक्त पाहणी करून युद्धपातळीवर दुरुस्ती करावी, धोकादायक भागांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना त्वरित राबवाव्यात आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

