(प्रकाश चाळके / देवळे)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टरांविषयी सहकारी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांकडून तक्रारी वाढत असून त्यांची बदली करण्याची मागणी आरोग्य सभापती विलास चाळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत करण्यात आली.
मात्र या बदली प्रक्रियेवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या आणि ज्यांच्याबाबत अनेक तक्रारी असल्याचे सांगितले जाते, अशा महिला डॉक्टरांना देवळे येथे आणण्यास स्थानिक नागरिकांचा ठाम विरोध आहे.
देवळे परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित डॉक्टर वेळेत रुग्णसेवेसाठी उपलब्ध राहत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे त्यांची बदली करावी, अशी मागणी सभेत मांडण्यात आली. मात्र त्याचवेळी साखरपा केंद्रातही त्यांच्या कार्यपद्धतीवर अनेक तक्रारी असल्याने त्यांना देवळे येथे नियुक्त करण्याच्या चर्चेमुळे नाराजी वाढली आहे.
साखरपा आरोग्य केंद्रातही संबंधित डॉक्टरांविषयी रुग्ण, महिला कार्यकर्ते आणि स्थानिकांकडून तपासणीतील त्रुटी, वेळेवर उपस्थितीचा अभाव आणि काही प्रकरणांमध्ये शासकीय लॅबऐवजी बाहेरील तपासण्यांसाठी सांगितले जात असल्याच्या तक्रारी झाल्याचे सांगण्यात येते. या मुद्द्यावर झालेल्या सभेत सुमारे दोन ते अडीच तास चर्चा झाली होती.
या पार्श्वभूमीवर देवळे परिसरात “तक्रारी असलेल्या डॉक्टरांना येथे बदली नकोच” अशी भूमिका नागरिकांकडून घेतली जात असून आरोग्य विभागाने या बदली प्रक्रियेबाबत स्पष्ट निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

