(संगमेश्वर / एजाज पटेल)
देवरूख आगाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे कोंडये-चाळकेवाडी मार्गावरील प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, या प्रकाराविरोधात डिंगणीचे उपसरपंच तथा भाजप संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. चाळकेवाडीसाठीची स्वतंत्र एसटी फेरी पूर्वसूचना न देता वारंवार रद्द केली जात असल्याचा आरोप करत, प्रवाशांची गैरसोय तातडीने थांबवावी, अन्यथा तीव्र संघर्षाचा इशारा त्यांनी दिला आहे.
देवरूख आगाराकडून चाळकेवाडीसाठी सुरू असलेली स्वतंत्र एसटी फेरी कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द केली जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर डिंगणी-फुणगूस पुलावरून थेट कोंडये येथे जाणारी ‘संगमेश्वर-कोंडये’ बसही ऐनवेळी असुर्डे, चाळकेवाडी आणि कुंभारखणीमार्गे वळवली जात असल्याने प्रवाशांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.
थेट मार्गावरील बसचा मार्ग बदलून अनेक गावांतील प्रवाशांचा भार एकाच बसवर टाकला जात असल्याने बसमध्ये मोठी गर्दी होत आहे. परिणामी वयोवृद्ध नागरिक, महिला तसेच शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वेळेवर बस उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींचा सामना करावा लागत असून, वयोवृद्ध प्रवाशांनाही गर्दी आणि लांबच्या प्रवासामुळे त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे.
दरम्यान, या समस्येबाबत त्रस्त प्रवाशांनी डिंगणीचे उपसरपंच तथा भाजप संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम यांच्याकडे तक्रार केली. प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर निकम यांनी देवरूख आगाराच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
“पूर्वसूचना न देता चाळकेवाडीची बसफेरी रद्द करणे आणि कोंडयेची बस लांबच्या मार्गाने वळवणे हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. यामुळे वयोवृद्ध नागरिक आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. प्रवाशांची गैरसोय यापुढे सहन केली जाणार नाही. एसटी प्रशासनाने तातडीने चाळकेवाडीची स्वतंत्र बसफेरी पूर्ववत सुरू करावी तसेच ‘संगमेश्वर-कोंडये’ बस डिंगणी-फुणगूस पुलावरून पूर्वीच्या थेट मार्गाने सुरू करावी. प्रवाशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगार व्यवस्थापनाला जाब विचारून प्रवाशांच्या हक्कासाठी तीव्र संघर्ष करावा लागेल,” असा इशारा मिथुन निकम यांनी दिला.

