(जम्मू / वृत्तसंस्था)
जम्मू-काश्मीरमधील रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची चाचणी यशस्वी झाली असून, भारतीय रेल्वेने ११७८ फूट उंचीवर उभारलेल्या जगातील सर्वाधिक उंच चिनाब रेल्वे पुलावरून वंदे भारत एक्स्प्रेस ताशी १०० किमी वेगाने धाववली. याच वेगाने भारतातील पहिल्या केबल-स्टे प्रकारातील अंजी पुलावरूनही वंदे भारत एक्स्प्रेसने यशस्वी प्रवास केला.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या चाचणीचा व्हीडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करत हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले. वाढीव वेगाची चाचणी यशस्वी झाल्याचे सांगताना त्यांनी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे नमूद केले. या चाचणीनंतर १११ किलोमीटर लांबीच्या श्री माता वैष्णोदेवी कटरा-बनिहाल मार्गावरील कमाल रेल्वे वेग ताशी ७५ किमीवरून ताशी १०० किमी करण्यात आला आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसने चिनाब पूल आणि अंजी पूल हे दोन्ही महत्त्वाचे पूल ताशी १०० किमी वेगाने पार केल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या यशामुळे यूएसबीआरएल प्रकल्पावरील रेल्वेगाड्यांचे संचालन अधिक सुलभ होण्यास मदत होईल. त्याचबरोबर प्रवासाचा वेळ कमी होऊन प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.
जून २०२५ मध्ये काश्मीर रेल्वे लिंकचे काम पूर्ण झाल्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा सुरुवातीला कटरा आणि श्रीनगरदरम्यान सुरू करण्यात आली होती. त्यानंतर एप्रिल २०२६ मध्ये ही सेवा जम्मू तवीपर्यंत वाढवण्यात आली. याच काळात ट्रेनमधील डब्यांची संख्या आठवरून २० करण्यात आली.
रेल्वे मंत्रालयानुसार, जम्मू-श्रीनगरदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसची नियमित सेवा २ मे रोजी सुरू झाली. दरम्यान, ऑगस्टमध्ये रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील रेल्वे नेटवर्कपैकी सुमारे ८१ टक्के नेटवर्क आता ताशी ११० किमी किंवा त्याहून अधिक वेगासाठी अपग्रेड करण्यात आले आहे. २०१४ मध्ये हे प्रमाण सुमारे ४० टक्के होते.


