(सोलापूर)
बार्शी–लातूर महामार्गावरील जांभळबेट पुलाजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जलद गतीने येणाऱ्या मालट्रकची कारला जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये कुर्डुवाडी येथील दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश असून सर्व जण एकाच गावचे रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्डुवाडी येथील सात जणांची कार देवदर्शनासाठी निघाली होती. जांभळबेट पुलाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, कारचा अक्षरशः चुराडा झाला. कारमधील सात पैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातावेळी कारमध्ये एक नवविवाहित दांपत्य होते. कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानंतरही या दांपत्याचा जीव थरारकपणे वाचला असून दोघेही गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर बार्शी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. माहिती मिळताच पांगरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया पांगरी पोलीस ठाण्यात सुरू आहे. या दुर्दैवी दुर्घटनेमुळे कुर्डुवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

