(खेड /रत्नागिरी)
खेड तालुक्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मडगावहून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)कडे जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसमधून एका पुरुषाने आपल्या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेसह आणि दीड वर्षांच्या मुलासोबत भर पावसात धावत्या रेल्वेतून उडी मारल्याची घटना घडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून, पुरुष आणि चिमुकला गंभीर जखमी झाले आहेत.
मेटे गावाजवळ घडली दुर्घटना
ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील मेटे गावाजवळील कोकण रेल्वे मार्गावर घडली. प्राथमिक माहितीनुसार, शुभ्रा अतिश दिवेकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सचिन सत्यवान जुवळे आणि त्यांचा दीड वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघेही मडगावहून मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. रेल्वे मेटे गावाजवळ पोहोचताच त्यांनी धावत्या रेल्वेतून उडी घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
रेल्वे पोलिसांची तातडीची कारवाई
घटना घडताच रेल्वेतील प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिघांनाही कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शुभ्रा दिवेकर यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत असून, सचिन जुवळे आणि त्यांच्या मुलावर उपचार सुरू आहेत.
नेमकं कारण अद्याप अस्पष्ट
या घटनेमागे कौटुंबिक वाद, मानसिक ताण किंवा अन्य कोणते कारण आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते, प्राथमिकदृष्ट्या हा आत्महत्येचा प्रयत्न असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून खेड पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

