(खेड)
तालुक्यातील भरणे नाका परिसरात शुक्रवारी (१७ एप्रिल) रात्री भीषण अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत अमित सूर्यकांत फावरे (वय ३७, रा. लोटे मालवाडी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
ही घटना रात्री सुमारे १० वाजता नवभारत हायस्कूलसमोर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अमित फावरे हे मुंबई-गोवा महामार्ग ओलांडत असताना गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या काळ्या रंगाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळले.
अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या फावरे यांना १०२ रुग्णवाहिकेतून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर संबंधित कार चिपळूणच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेली. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून प्रकरणाची नोंद केली आहे.
महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अज्ञात वाहनाचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
या घटनेमुळे लोटे मालवाडी परिसरात शोककळा पसरली असून, मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

