(खेड / प्रतिनिधी)
खेडची कन्या प्रज्ञा शेट यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प (५,३६४ मीटर) आणि काला पत्थर (५,५४५ मीटर) यांसारखे दुर्गम आणि आव्हानात्मक ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण करून खेडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. एवढेच नव्हे, तर ही मोहीम फत्ते करणारी त्या खेडमधील पहिली महिला ठरल्या आहेत.
या अद्वितीय कामगिरीत प्रज्ञा यांना त्यांचे पती समीर शेट (पुणे) आणि अवघ्या १० वर्षांचा मुलगा रुद्रांश शेट यांनीही साथ दिली. विशेष बाब म्हणजे, रुद्रांश न्यू जर्सी (अमेरिका) येथून एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणारा दुसरा सर्वात लहान मुलगा ठरला आहे. या चिमुकल्याने दाखवलेले धैर्य आणि जिद्द कौतुकास्पद आहे.
शेट कुटुंबीय ७ एप्रिल २०२५ रोजी काठमांडूला दाखल झाले आणि ८ एप्रिलपासून त्यांनी ट्रेकच्या तयारीला सुरुवात केली. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे रामेछापहून लुक्ला विमानतळाकडे जाणारी त्यांची नियोजित फ्लाईट रद्द झाली. यामुळे या कुटुंबाला तब्बल १७ तासांचा खडतर प्रवास करत सुरेके गावातून आपल्या ध्येयाकडे कूच करावी लागली.
प्रचंड पाऊस, जोरदार हिमवृष्टी आणि बफार्चे वादळ अशा अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करत प्रज्ञा, समीर आणि रुद्रांश यांनी आपल्या अदम्य साहस, चिकाटी आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतचा खडतर प्रवास पूर्ण केला. फाकदिंग, नाम्चे बाजार, डिंगबोचे, लाबुचे आणि गोरकशेप यांसारख्या उंचीवरच्या दुर्गम गावांमधून मार्ग काढत या कुटुंबाने आपले स्वप्न साकार केले.
प्रतिकूल हवामान आणि कमी सराव असूनही, या कुटुंबाने दाखवलेली जिद्द आणि आत्मविश्वास अनेक लोकांसाठी प्रेरणास्रोत ठरला आहे. प्रज्ञा शेट यांचे हे यश केवळ खेडसाठीच नव्हे, तर प्रत्येक स्त्री आणि कुटुंबासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी दाखवून दिले आहे की दृढनिश्चय आणि एकत्र प्रयत्नांनी कोणतेही शिखर सर करणे शक्य आहे. त्यांच्या या अद्वितीय कामगिरीबद्दल खेडमध्ये त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.