(खेड)
तालुक्यातील शिवतर रोडवरील रोहिदास नगर येथे मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झाडांच्या कुंड्यांना पाणी घालण्याच्या किरकोळ कारणावरून मोठा वाद उद्भवला. या वादातून झालेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झाले असून, खेड पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, प्रथमेश चंद्रकांत गिम्हवणेकर (वय ३४), हे त्यांच्या घराच्या बांधावर ठेवलेल्या झाडांना पाणी घालत असताना, एका महिलेस याचा राग आला आणि तिने विनाकारण त्यांना शिवीगाळ सुरू केली. प्रथमेश यांनी तीव्रता न वाढवता तिला समज दिली, मात्र नंतर सागर सुरेश खेडेकर (आरोपी क्र. २) याने लोखंडी रॉडने त्यांच्या कुंड्यांचे नुकसान केले व प्रथमेश यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले.
घटनेदरम्यान प्रथमेश यांची बहीण शर्मिला सचिन बुधकर (वय ३९) त्यांना मदत करण्यासाठी आली असता, सागरने तिलाही रॉडने हातांवर मारून जखमी केले. त्यानंतर आरोपी सुयोग सुरेश खेडेकर (आरोपी क्र. ३) व एका अज्ञात महिलेसह (आरोपी क्र. ४) त्यांनी गिम्हवणेकर कुटुंबाला शिवीगाळ, दमदाटी केली व ठार मारण्याची धमकी दिली.
जखमींवर कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, प्रथमेश गिम्हवणेकर यांच्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ११८(१), १३१, ३२४(४)(५), ५०४, ५०६(२) आणि ३४ प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.