( नवी दिल्ली )
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि संघटनात्मक बदल लक्षात घेऊन सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांच्यात नुकतीच सुमारे तीन तास महत्त्वाची बैठक झाल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत सरकार आणि पक्ष संघटनेतील संभाव्य बदल, नव्या जबाबदाऱ्या आणि आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा झाली.
या फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर कोणत्या मंत्र्यांना बढती मिळणार, कोणाला डच्चू मिळणार आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील काही नव्या चेहऱ्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळू शकते.
पियूष गोयल अर्थमंत्री होण्याची चर्चा
सध्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांचे नाव संभाव्य अर्थमंत्री म्हणून चर्चेत आहे. चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या गोयल यांना अर्थविषयक चांगला अनुभव असल्याने त्यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ते सध्या मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
निर्मला सीतारामन यांच्याकडे शिक्षण मंत्रालय?
सूत्रांच्या माहितीनुसार, विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते. तसे झाल्यास त्या विद्यमान शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची जागा घेऊ शकतात. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यांना कॅबिनेट दर्जाचे खाते मिळू शकते. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास आणि पंजाबमधील भाजप नेते तरुण चुग यांची नावेही संभाव्य मंत्रिपदासाठी चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.
संघटना आणि सरकारमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता
काही विद्यमान केंद्रीय मंत्र्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात, तर संघटनेतील काही वरिष्ठ नेत्यांना केंद्र सरकारमध्ये स्थान मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि संघटनेत समन्वय साधण्यासाठी हा फेरबदल महत्त्वाचा मानला जात आहे.
मित्रपक्षांनाही प्रतिनिधित्व
एनडीएतील मित्रपक्षांनाही मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांपैकी एखाद्याला केंद्रीय मंत्रिपद मिळू शकते, अशी चर्चा आहे. तसेच जनता दल (युनायटेड) प्रमुख नीतीश कुमार यांनी केंद्र सरकारमध्ये आपल्या पक्षाला अधिक प्रतिनिधित्व मिळावे, अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात जेडीयूलाही अधिक जागा मिळू शकतात.

