(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या 36 दिवसांपासून सुरू असलेले कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे आंदोलन मागे घेण्यात आल्याचा दावा संघटनेच्या नेतृत्वाने केला आहे. केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलनकर्त्यांच्या तीन प्रमुख मागण्यांवर सहमती झाल्याचे सांगत सीजेपीने आंदोलन समाप्त करण्याची घोषणा केली. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, जितेंद्र सिंह आणि प्रवक्ते सौरभ दास व आशुतोष रांका यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे केंद्र सरकारच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेच्या तिसऱ्या फेरीत केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह, तसेच सीजेपीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची माहिती देण्यात आली.
सीजेपीच्या नेत्यांनी सांगितले की, आंदोलन सुरू करताना शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती आणि ती सरकारने मान्य केल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे भाजपशासित राज्यांमध्ये मागे घेतले जातील, भविष्यात कोणतीही सूडबुद्धीची कारवाई होणार नाही आणि आंदोलनात जखमी झालेल्यांना ₹1 कोटींची नुकसानभरपाई देण्याची मागणीही स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सीजेपीच्या म्हणण्यानुसार, या सर्व निर्णयांबाबत केंद्र सरकार मंगळवारपर्यंत लेखी हमीपत्र देणार आहे. प्रमुख मागण्यांवर तत्त्वतः सहमती झाल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
जे. पी. नड्डा यांचे वक्तव्य
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या विविध मुद्द्यांवर सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली. विविध राज्यांमध्ये दाखल झालेले एफआयआर कायदेशीर प्रक्रियेनुसार मागे घेण्याबाबत विचार केला जाईल. तसेच जखमी आंदोलनकर्त्यांना योग्य नुकसानभरपाई देण्याच्या मुद्द्यावरही सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.
नड्डा यांनी पुढे सांगितले की, आंदोलनकर्त्यांनी सादर केलेल्या मागण्यांच्या सनदेचा सरकार सखोल अभ्यास करेल. शैक्षणिक सुधारणांसंदर्भात सीजेपीच्या प्रतिनिधींशी पुढील काळातही चर्चा सुरू ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

