(डोंबिवली/मालेगाव )
प्रेमासाठी घरच्यांचा विरोध पत्करून केलेल्या विवाहाचा अत्यंत दुर्दैवी शेवट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालेगावातील अनिकेत जगताप यांनी आत्महत्या केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत त्यांची पत्नी श्रुती पवार (जगताप) हिनेही कल्याणमधील राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. श्रुतीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
प्रेमविवाहानंतर सुरू झाला कौटुंबिक वाद
श्रुती पवार आणि अनिकेत जगताप यांनी सुमारे दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. कुटुंबीयांचा विरोध पत्करून दोघांनी संसार सुरू केला. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच कौटुंबिक वाद वाढल्याचा आरोप आहे. श्रुतीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सासरच्या मंडळींकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ होत होता. त्यामुळे ती कल्याणजवळील शहाड येथे आपल्या नातेवाईकांकडे राहू लागली होती. या प्रकरणी तिने महिला तक्रार केंद्रातही धाव घेतली होती.
पतीच्या आत्महत्येनंतर प्रकरण अधिक गुंतागुंतीचे
महिला तक्रार केंद्रातील सुनावणीनंतर त्याच दिवशी अनिकेत जगताप यांनी मालेगाव येथे आत्महत्या केली. त्यानंतर अनिकेतच्या कुटुंबीयांनी श्रुती, तिचे आई-वडील आणि नातेवाईकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात श्रुतीच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली होती. दुसरीकडे, श्रुतीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्याच काळात सोशल मीडियावर तिच्याविरोधात विविध पोस्ट व्हायरल झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, याच काळात वटपौर्णिमेच्या दिवशी ‘पत्नीनेच पतीचा जीव घेतला’ अशा खोट्या पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आल्या आणि दीर राहूल जगताप याच्याकडून श्रुतीवर वारंवार मानसिक दबाव आणला असल्याचा आरोप आहे.
सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप
श्रुतीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सासरच्या मंडळींकडून झालेल्या कथित छळाचा उल्लेख केल्याचे सांगितले जात आहे. तसेच आपल्या मृत्यूनंतर दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तुरुंगात असलेल्या आई-वडिलांची सुटका व्हावी आणि स्वतःचा अंत्यसंस्कार पती अनिकेत यांच्या अंत्यसंस्कारासोबत करण्यात यावा, अशी इच्छा तिने व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. सुसाईड नोटची सत्यता आणि त्यातील मजकूराचा तपास पोलीस करत आहेत. या पत्रात तिने तिच्यासोबत झालेल्या क्रूरतेबद्दल लिहिलंय. तर निर्दोष आई वडिलांना सोडा आणि दोषींना कठोर शिक्षा करुन त्यांना जेलमध्ये पाठवा, अशी मागणी केली आहे.
अनिकेतच्या आत्महत्येप्रकरणी आधीच गुन्हा दाखल
अनिकेत जगताप यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून मालेगाव कॅम्प पोलिसांनी श्रुती, तिची आई-वडील आणि एका नातेवाईकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. फिर्यादीत श्रुतीकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात श्रुतीचे आई-वडील अटकेत होते, तर श्रुतीविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.
आता श्रुतीच्या तक्रारीवरूनही गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया
श्रुतीच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी सांगितले की, श्रुतीच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे संबंधितांविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.

