(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळील ओझरखोल परिसरात रविवारी रात्री मालवाहू चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळून पलटी झाली. यावेळी अपघात झाल्याचा आवाज परिसरात मोठ्या प्रमाणात ऐकू आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून केवळ वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात रात्री सुमारे आठ ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडला.
एमएच ०७ एजे १६७२ क्रमांकाचे मालवाहू वाहन ओझरखोलमधून जात असताना अचानक नियंत्रण सुटले. स्थानिकांच्या माहितीनुसार, वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाला गाडी सांभाळता आली नाही. परिणामी गाडी दुभाजकावर चढून उलटली.
अपघाताच्या वेळी महामार्गावर वाहतूक सुरू होती. मात्र पलटी झालेली गाडी विरुद्ध मार्गिकेत न गेल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा समोरून येणाऱ्या वाहनांशी धडक होऊन गंभीर परिणाम होण्याची शक्यता होती.
घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली. चालक सुखरूप असून पुढील तपास सुरू आहे.

