(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
यंदा पावसाळ्याची लवकर सुरुवात झाल्यामुळे आणि गणेशोत्सवदेखील अपेक्षेपेक्षा लवकर येत असल्यामुळे गणपती मूर्तीकार, चित्रकार आणि रंगकारांनी आपल्या कामांना वेग दिला आहे. २६ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होत असल्यामुळे कोकणातील विविध गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये मातीची मूर्ती घडवण्याबरोबरच रंगकामाची लगबगही सुरू झाली आहे.
कोकणातील सुप्रसिद्ध चित्रकार, रांगोळी कलाकार आणि गणेशमूर्ती डोळ्यांचे रेखाटन करणारे विलास विजय रहाटे (मूळ गाव: मुर्तवडे, ता. संगमेश्वर) देवरुख मध्ये स्थायिक झाले आहेत. रहाटे यांनी आपले रंगकाम व रेखाटनाचे कार्य सुरू केले आहे. दरवर्षी ते रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील अनेक गणपती कारखान्यांमध्ये जाऊन सुमारे ६५०० ते ७००० गणेशमूर्तींचे रंगकाम करतात.
विशेष म्हणजे, रेखाटन आणि रंगकाम हे केवळ व्यवसाय नसून भक्तिभावाने ते श्रीगणेश डोळ्यांना ‘प्राण’ फुंकण्याचे कार्य करतात, असे ते सांगतात. त्यांच्या कलाकृतींमुळे ते विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित झाले असून, कला क्षेत्रातील मान्यवरांकडूनही त्यांचा गौरव झाला आहे. यंदाच्या वर्षीही रंगकाम आणि मूर्ती सजावटीचे कार्य निर्विघ्न पार पडावे, अशी प्रार्थना त्यांनी गणरायाच्या चरणी केली आहे.

