(रत्नागिरी)
कृषीदिनानिमित्त मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण व सन्मान सोहळ्यात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते सन २०२३ व २०२४ या वर्षांतील डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण तसेच विविध कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण सहा जणांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. यामध्ये सन २०२३ मधील दोन तर सन २०२४ मधील चार पुरस्कारांचा समावेश आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्यासह कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
सन २०२३ मधील पुरस्कारार्थी
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (ठाणे विभाग) हा पुरस्कार ओणी (ता. राजापूर) येथील डॉ. शैलेश सुभाषचंद्र शिंदेदेसाई यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रु. १ लाख २० हजारांचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे.
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) मांडकी (ता. चिपळूण) येथील अनंत बाबाजी खांबे यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कारात रु. ४४ हजारांचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले.
सन २०२४ मधील पुरस्कारार्थी
वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार (ठाणे विभाग) पावस (ता. रत्नागिरी) येथील आनंद जयंत देसाई यांना प्रदान करण्यात आला. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे स्वरूप रु. २ लाखांचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे.
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (ठाणे विभाग) नेवरे (ता. रत्नागिरी) येथील ज्येष्ठ कृषी पत्रकार मैरुन हमीद नाकाडे यांना प्रदान करण्यात आला. कृषीविषयक जनजागृती, शेतकरी हिताचे प्रश्न आणि कृषी क्षेत्रातील सातत्यपूर्ण पत्रकारितेची दखल घेत त्यांचा हा सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रु. १ लाख २० हजारांचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे.
उद्यान पंडित पुरस्कार (ठाणे विभाग) भिले (ता. चिपळूण) येथील धनंजय श्रीकृष्ण केतकर यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कारात रु. १ लाखांचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले.
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) खरवते-गावठाणवाडी (ता. राजापूर) येथील दयानंद बाबाजी चौगुले यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रु. ४४ हजारांचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी, कृषी तज्ज्ञ, कृषी पत्रकार आणि उद्यान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राच्या कार्याची राज्यपातळीवर दखल घेण्यात आली आहे. या यशाबद्दल सर्व पुरस्कारार्थींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

