(संगमेश्वर / एजाज पटेल)
कोंडअसुर्डे (ता. संगमेश्वर) येथील लहानग्या सचिन विनीत खेडेकर (वय ७) याने आपल्या अविश्वसनीय क्रीडा कामगिरीने संपूर्ण तालुका आणि जिल्ह्याचा मान उंचावला आहे. सचिनला प्रतिष्ठेचा “मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला असून, त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सध्या सचिन कोल्हापूर येथील VIBGYOR School मध्ये इयत्ता दुसरीत शिकत आहे. गेल्या वर्षभरापासून तो एस.के. स्केटिंग अकॅडमी मध्ये प्रशिक्षक श्री. सुहास कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंगचे प्रशिक्षण घेत आहे. अल्पवयातच त्याने शालेय, तालुका आणि जिल्हा स्तरावर अनेक पदके पटकावली असून ७९ मिनिटांचे सलग स्केटिंग करून दोन जागतिक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत.
२९ ऑगस्ट रोजी छत्रपती राजर्षी शाहू स्मारक सभागृह, कोल्हापूर येथे सचिनचा हा मानाचा सन्मान करण्यात आला. या यशामुळे संगमेश्वर तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली आहे.
सचिनच्या पुरस्कारप्राप्तीनंतर अभिनंदनाचा वर्षाव सुरू असून, सचिनचे वडील विनीत खेडेकर यांच्या मोबाईल, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवर मित्रपरिवार व नातेवाईक सतत शुभेच्छा व्यक्त करत आहेत. नुकतेच पैसा फंड इंग्लिश हायस्कूल, संगमेश्वर – 1991 च्या दहावीच्या बॅचतर्फे सचिनचा विशेष सत्कार करण्यात आला. गणेशोत्सवाच्या उत्साहात हा सन्मान मिळणे म्हणजे गणरायाचे आशीर्वादच असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

