(देवरुख / सुरेश सप्रे)
संगमेश्वर तालुक्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायत जागांसाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, यामध्ये अनेक धक्कादायक आणि लक्षवेधी निकाल समोर आले आहेत. तुरळ, कोंडगाव, साखरपा आणि राजिवली या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि सदस्य पदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत निवडून आलेल्या उमेदवारांची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली आहे.
तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत खालील उमेदवार विजयी झाले आहेत.
ग्रामपंचायत तुरळ: सरपंच पदी हरेकर रामचंद्र धोंडू ६८५ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी नंदकुमार शांताराम फडकले (४९२ मते) यांचा पराभव केला.
ग्रामपंचायत साखरपा: सरपंच पदी साळसकर रश्मी रविंद्र ४६३ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी भाग्यश्री संजय सुर्वे (३४९ मते) यांना पराभूत केले.
ग्रामपंचायत कोंडगांव: येथे सरपंच पदी जोशी धनश्री राजेंद्र ६८५ मते घेऊन विजयी झाल्या. त्यांनी रुपाली राजेंद्र कीर (६२८ मते) यांचा पराभव केला.
ग्रामपंचायत राजिवली: सरपंच पदी शिके प्रगती प्रशांत २७८ मते मिळवून विजयी झाल्या असून त्यांनी राजेश बळवंत शिके (२१० मते) यांचा पराभव केला.
सदस्य पदाचे निकाल
काही प्रभागांमधील सदस्य पदांसाठीही चुरस पाहायला मिळाली:
राजिवली (प्रभाग क्र. १): सदस्य पदी कदम सचिन सोनू ८१ मते मिळवून विजयी झाले.
ओझरखोल (प्रभाग क्र. २): सदस्य पदी वाडकर दिपेश दिपक ८७ मते मिळवून विजयी झाले आहेत.
या निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी रतन देसाई, सागर गावीत आणि तानाजी नाईक यांनी संबंधित ग्रामपंचायतींचे निकाल अधिकृतरित्या घोषित केले. या विजयानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विजयी उमेदवारांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

